अहमदाबाद – शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या तिघांसह चमूतील एकूण सात जणांना करोनाची लागण झाल्यामुळे सलामीवीर मयांक अगरवाल आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनचा भारतीय संघात समावेश केला आहे.
मयांकला तीन दिवसांचे विलगीकरण बंधनकारक असल्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ६ फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या दिवशी तो उपलब्ध होऊ शकेल. बुधवारी भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाला. यात अनुभवी सलामीवीर धवन, फलंदाज श्रेयस आणि राखीव सलामीवीर ऋतुराज यांच्यासह नेट गोलंदाज नवदीप सैनी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, सुरक्षा अधिकारी बी. लोकेश आणि साहाय्यक राजीव कुमार यांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले. दरम्यान, अहवाल नकारात्मक आलेल्या अन्य खेळाडूंनी गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सराव मार्गदर्शकांसह हलका सराव केला.