टेनिस स्पर्धात बोपण्णा-रामकुमार जोडी उपांत्य फेरीत दाखल;

पुणे – भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित जोडीने रोमहर्षक विजयासह गुरुवारी टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे.
बोपण्णा-रामकुमार जोडीने अॅलेक्झांडर ईर्लेर (ऑस्ट्रिया) आणि जिरी व्हेसली (चेक प्रजासत्ताक) जोडीला ७-६ (७-३), ७-६ (७-४) असे पराभूत केले. बोपण्णा आणि रामकुमार हे दुसऱ्या एटीपी स्पर्धेत एकत्रितपणे खेळत आहेत. उपांत्य फेरीत सॅदिओ डॉम्बिआ आणि फॅबिएन रीबाऊल जोडीशी त्यांचा सामना होणार आहे.
पुरुष दुहेरीतील अन्य लढतीत साकेत मायनेनी आणि शशीकुमार मुकुंद या भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. ल्युक सेव्हिल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या अग्रमानांकित ऑस्ट्रेलियन जोडीने त्यांना ३-६, ७-५, १०-३ असे नमवले. तसेच जियानलुका मागेर (इटली) व एमिल रूसुवोरी (फिनलंड) या जोडीने माघार घेतल्याने विष्णू वर्धन आणि एन. श्रीराम बालाजी जोडीला पुढेचाल मिळाली.
दरम्यान, युकी भांब्रीचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत ९३व्या क्रमांकावरील इटलीच्या स्टीफानो ट्रॅव्हागलिआने युकीला ६-३, ६-२ असे नामोहरम केले.
Comments are closed.