बडोदा संघचा फलंदाज विष्णू सोलंकीच्या तन्ह्या बाळाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. मात्र खासगी आयुष्यातील या दुखाला बाजूला सारत विष्णू मैदानात उतरला आणि त्याने चंदीगढच्या संघाविरुद्ध दमदार शतक ठोकलं. रणजी स्पर्धेच्या २०२२ च्या पर्वामध्ये शुक्रवारी विष्णूने भुवनेश्वरमध्ये खेळताना ही कामगिरी केलीय. या कामगिरीच्या जोरावर बडोद्याचा संघ दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सात बाद ३९८ धावांपर्यंत मजल मारु शकला. चंदीगढवर बडोद्याने २३० धावांची आघाडी घेतलीय. चंदीगढचा पहिला डाव १६८ धावांवर आटोपला.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर त्याने १६१ चेंडूंमध्ये नाबाद १०३ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार लगावले.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विष्णूने १६१ चेंडूंमध्ये नाबाद १०३ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार लगावले. ज्योत्सनील सिंगने त्याला विष्णूला चांगली सात दिली. ज्योत्सनीलने ९६ धावांची खेळी केली. मात्र तो धावबाद झाला.
सौराष्ट्रचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डॉन जॅक्सनने ट्विटरवरुन विष्णूचं आणि त्याच्या कुटुंबाचं कौतुक केलं आहे. खासगी आयुष्यामध्ये एवढा मोठी घटना घडल्यानंतरही काही दिवसांमध्ये मैदानात उतरुन संघासाठी शतक झळकावल्याबद्दल शेल्डॉनने विष्णूवर कौतुकाचा वर्षाव केलाय. “काय खेळाडू आहे हा. मी ओळखत असलेला सर्वात कणखर खेळाडू. विष्णू आणि त्याच्या कुटुंबाला मी सलाम करतो. अशाप्रकारचा निर्णय घेणं सोपं नसतं. तुझी अशीच अनेक शतकं होत राहोत आणि तुला यश मिळो, असं जॅक्सनने ट्विटमध्ये म्हटलंय.
बडोदा क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशीर हतंगंडी यांनी विष्णू सोलंकी हा माझ्यासाठी खऱ्या आयुष्यातील हिरो आहे असं म्हटलंय.
विष्णू हा भुवनेश्वरमध्ये या सामन्यासाठी दाखल झालेला असतानाच त्याला त्याच्या चिमुल्या मुलीच्या मृत्यूसंदर्भातील माहिती फोनवरुन मिळाली. अवघ्या एक दिवसाच्या चिमुकलीचा १२ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला बायो बबलबाहेर जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर हैदराबाद मार्गे विष्णू बडोद्याला आला. त्याने आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी तो पुन्हा मनावर दगड ठेऊन संघासाठी भुवनेश्वरला परतला. नियोजित क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करुन तो मुलीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनंतर लगेच मैदानात खेळण्यासाठी उतरला आणि त्याने शतक ठोकलं. पण संघाचा उपकर्णधार असणाऱ्या विष्णूने हे शतक साजरं केलं नाही.·