युवा भारतीय बॅडिमटनपटू; लक्षवेधी कामगिरीसाठी सज्ज;

नवी दिल्ली  – आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होणार असून लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांसारखे युवा भारतीय खेळाडू या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.

या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या पुरूष संघापुढे कोरिया, तर महिला संघापुढे यजमान मलेशियाचे आव्हान असेल. भारताच्या अनुभवी खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत पुरुष संघाची जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनवर भिस्त असून किरण जॉर्ज आणि मिथून मंजुनाथ यांची त्याला साथ लाभेल.

पुरुष दुहेरीत रवीकृष्ण पीएस-शंकर प्रसाद उदयकुमार आणि मनजित सिंह-डिंकू सिंग कोंथूजाम यांचा चांगल्या कामगिरीचा प्रयत्न असेल. अ-गटात समाविष्ट असलेल्या भारतीय पुरुष संघाचे कोरियाव्यतिरिक्त तीन वेळा विजेत्या इंडोनेशिया आणि हॉंगकॉंग यांच्याशी सामने होतील.

दुसरीकडे सय्यद मोदी स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी मालविका, आकर्षि कश्यप आणि अश्मिता चाहिला यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाचे मलेशियासह गतविजेत्या जपानशी सामने होणार आहेत. भारतीय महिला संघाला ब-गटातून आगेकूच करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. तसेच या कामगिरीसह हे संघ मे महिन्यात होणाऱ्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

You might also like

Comments are closed.