मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकच्या उपांत्य फेरीत आधीच आपले स्थान निश्चित केले आहे, तर तिसरे आणि चौथे स्थान अद्याप अनिश्चित आहे. भारत, वेस्ट इंडिज किंवा इंग्लंडला मायदेशी परतावे लागणार आहे. तसेच आज वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना रद्द झाल्याने भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महिला विश्वचषक २०२२ मध्ये लीग टप्प्यातील २४वा सामनाभारताच्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार होता. मात्र सामन्यात पावसामुळे खेळ पुढे जाऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात आला. त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही आणि दोन्ही संघांना १ -१ गुण देण्यात आला. अशा परिस्थितीत आता वेस्ट इंडिज ७ गुणांसह गुणतालिकेत भारताच्या अगदी पुढे तिसऱ्या स्थानावर आला आहे.
दुसरीकडे, बरोबरीमुळे एका गुणामुळे ९ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचणारा दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतरचा दुसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्याने भारताला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भारत ६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. आज दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला असता आणि इंग्लंडने त्यांच्या पुढील २ सामन्यांपैकी एक सामना गमावला असता, तर टीम इंडिया लीग टप्प्यातील शेवटचा सामना गमावल्यानंतरही उपांत्य फेरीत प्रवेश करू शकली असती. मात्र आजचा सामना बरोबरीत असल्याने समीकरण वेगळे झाले आहे.