औरंगाबाद (प्रतिनिधी): नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त साक्षी चितलांगेने उपविजेतेपद पटकावले होते. तिने या स्पर्धेत वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा नॉर्म देखील मिळवला. तिच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्यावतीने औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार अतुल सावे यांनी साक्षी चितलांगे हिला २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार केला.
साक्षीचे सध्या २२६२ रेटिंग गुण आहेत. तिने आत्तापर्यंत देशासाठी नऊ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. राज्य बुद्धिबळ संघटनेचे सरचिटणीस निरंजन गोडबोले यांनी तिला हे बक्षीस जाहीर केले होते. आमदार अतुल सावे यांनी साक्षीच्या निवासस्थानी जाऊन धनादेश प्रदान केला. या प्रसंगी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल, पंच अजय पटेल, प्रशिक्षक विलास राजपूत, मिथुन वाघमारे, गोविंद केंद्रे, साक्षीचे वडील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त दिनेश चितलांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.