औरंगाबाद (प्रतिनिधी) स्पॅनिश आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाने एकूण २१ पदके (६ सुवर्ण, ७ रौप्य, ८ कांस्य) जिंकून आपला दबदबा राखला. स्पर्धेत औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील युवा खेळाडू नीलेश गायकवाडने कांस्यपदक जिंकून आपल्या २०२४ पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. पदकासाठी झालेल्या लढतीत जागतीक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्यात तरुण यांच्याकडून नीलेशला १३-२१, १५-२१ ने पराभव स्विकारावा लागला.
नीलेश सध्या जागतीक क्रमवारीत १३ व्या स्थानी आहे. नीलेश द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गौरव खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. दुसरीकडे, जगातील नंबर वन पॅरा खेळाडू नागपूरच्या मानसी जोशीने आर. रघुपती सोबत मिळून मिश्र दुहेरी आणि एकेरीचे सुवर्णपदक पटकावत स्पर्धेचा समारोप केला. टोकियो पॅरालिम्पियन प्रमोद भगतने २ रौप्य व १ कांस्यपदक पटकावले. नित्या सेरे, राजा, कृष्णा नागर, राज कुमार व पारुल, चिराग बरेथ व राज कुमार, नितेश कुमार व तरुण ढिल्लो यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.