आयपीएलमध्ये पुढच्या हंगामात दोन नवीन फ्रेंचायझी सामील केल्या जाणार आहेत. या दोन फ्रेंचायझींपैकी एक आहे लखनऊ. लखनऊ फ्रेंचायझी सध्या संघासाठी मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. फ्रेंचायझी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यासाठी दोन नावांवर विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, या नवीन फ्रेंचायझीच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी ऍण्डी फ्लॉवर आणि डॅनियल व्हेटोरी यांच्यात स्पर्धा सुरू आहे.
या दोघांव्यतिरिक्त ट्रेवर बायलिस आणि गॅरी कर्स्टन देखील या पदासाठी शर्यतीत होते. पण आता ते या शर्यंतीतून बाहेर पडले आहेत. सध्या जी दोन नावे या मुख्य प्रशिक्षक पदासाठी प्रमुख दावेदार मानली जात आहेत, त्यापैकी फ्लॉवर यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता जास्त आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंजाब किंग्स संघाच्या सहप्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
फ्लॉवर आणि केएल राहुल यांच्यात चांगले संबंध आहेत. अशात त्यांना लखनऊ फ्रेंचायझीच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात नियुक्त केले जाऊ शकते. मागच्या काही दिवसांपासून अशीही चर्चा आहे की, केएल राहुलला लखनऊ फ्रेंचायझी विकत घेईल आणि त्याला कर्णधार केले जाईल. जर असे झाले तर, फ्लॉवर आणि राहुलची जोडी पुन्हा एकदा मैदानावर धमाका करू शकते. दरम्यान, लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही नवीन फ्रेंचायझींकडे तीन खेळाडूंना रिटेन करण्याची संधी आहे. अशात केएल राहुल लखनऊ संघात जाण्याची जास्त शक्यता आहे.