मुंबईत शतक करणाऱ्या मयंकच्या कामी आला एका मुंबईकराचाच सल्ला, स्वत: सलामीवीराचा खुलासा

मुंबई(प्रतिनिधी) शुक्रवारपासून (३ डिसेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना वानखेडे स्टेडियमवम सुरु झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने शतकी खेळीसह सर्वांना प्रभावित केले. या शतकी खेळीनंतर मयंकने महान फलंदाज सुनील गावसकर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले असल्याचा खुलासा केला.

खरंतर मयंक गेल्या काही दिवसांपासून कसोटीमध्ये चांगल्या लयीत नव्हता. त्यामुळे त्याच्यासाठी मुंबई कसोटीत केलेले शतक दिलासा देणारे होते. त्याने पहिल्या दिवशी नाबाद १२० धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताने पहिल्या दिवसाखेर ४ बाद २२१ धावा केल्या.

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर मयंकने सांगितले की, त्याने गावसकरांच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून आपल्या फलंदाजीत थोडा बदल केला, जो फायदेशीर ठरला. गावसकरांनीही समालोचन करताना सांगितले होते की त्यांनी मयंकला त्याच्या बॅक-लिफ्टवर काम करण्याचा सल्ला दिला होता.

कारकिर्दीतील चौथे कसोटी शतक झळकावणारा मयंक म्हणाला, ‘त्यांनी मला सांगितले होते की डावाच्या सुरुवातीला मी बॅट खाली ठेवण्याचा विचार करायला हवा, जी मी थोडी वर ठेवतो. मी कमी वेळात इतके बदल करू शकत नाही. मी त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्या खांद्याच्या स्थितीचे निरिक्षण केले होते.’

राहुल द्रविडनेही दिलेला सल्ला
मयंकने न्यूझीलंडविरुद्ध शतक जरी केले असले, तरी जेव्हा रोहित शर्मा आणि केएल राहुल संघात पुनरागमन करतील, तेव्हा त्याच्यासाठी सालमीची जागा टिकवून ठेवणे सोपे असणार नाही, याची कल्पना देखील त्याला आहे. याबद्दल बोलताना मयंकने सांगितले की भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला सांगितले होते की पुढे काय होईल, याचा विचार न करता, जे त्याला शक्य आहे ते कर.

मयंकने सांगितले ‘जेव्हा मला अंतिम ११ जणांच्या संघात निवडण्यात आले होते, तेव्हा राहुल भाईने (द्रविड) माझ्याशी चर्चा केली होती. त्याने मला सांगितले होते की, माझ्या हातात जे आहे, ते कर आणि मैदानात उतरुन आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कर. द्रविडने मला सांगितले की जेव्हा तुला चांगली सुरुवात मिळेल, तेव्हा त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्याचा प्रयत्न कर. मला जशी सुरुवात मिळाली, त्याचा फायदा घेण्यात यश आल्याचा मला आनंद आहे. पण राहुल द्रविडकडून स्पष्ट संदेश होता की मी या खेळीला अविस्मरणीय बनवू.’

याशिवाय मयंकने त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे फारसे खेळण्याची संधी न मिळाल्याबद्दल निराशा देखील व्यक्त केली.

You might also like

Comments are closed.