महिला विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला ३ धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आलेल्या वेस्टइंडिज संघाने ५० षटकात ९ गडी गमवून २५९ धावा केल्या आणि विजयासाठी २६० धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडचा संघ २५६ धावाच करू शकला.
वेस्ट इंडिजकडून सलामीला डीन्ड्रा डोट्टिन आणि हेले मॅथ्यू आले. संघाची धावसंख्या १२ असताना वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला. डीन्ड्रा १२ धावा करून बाद झाली. त्यानंतक कासिया नाइटही तग धरू शकली नाही अवघ्या पाच धावा करून तंबूत परतली. त्यानंतर हेले आणि स्टेफनी टेलरनी संघाचा डाव सावरला. वेस्ट इंडिजकडून हेले मॅथ्यू हीने १२८ चेंडू ११९ धावांची खेळी केली. या खेळीत तिने १६ चौकार आणि १ षटकार मारला. स्टेफनी टेलरने ४७ चेंडूत ३० धावा केल्या. शॅमेन कॅम्पबेलेने २० धावा, चेडीन नेशननं ३६ धाव, चिनले हेन्रीने ८ धावा, अलिया अॅलेनेने २ धावा, तर शमिल्ला कॉनेल आणि अनिसा मोहम्मद नाबाद राहीले.
न्यूझीलंडचा डाव -वेस्ट इंडिजने दिलेल्या २६० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अडखळत सुरुवात झाली. सुझी बेटस ३ धावा करून धावचीत झाली. त्यानंतर अमेलिया केरही १३ धावा करून पायचीत झाली. न्यूझीलंडकडून सोफिया डेवाइन हीने १२७ चेंडूत १०८ धावा केल्या. कर्णधारपदाला साजेशी अशी कामगिरी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. तळाच्या कॅटे मार्टिन आणि जेस जोडीने विजय मिळवण्यासाठी चांगली भागिदारी केली. पण ही जोडी बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.