वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील.
यंदा २७ मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे ‘आयपीएल’चा १५वा हंगाम खेळवण्यात येण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे काही नामांकित खेळाडू विविध दौरे तसेच वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना संपूर्ण ‘आयपीएल’ खेळण्याची मुभा दिली आहे. यंदाच्या हंगामात विंडीजचे १७, तर आफ्रिकेचे ११ खेळाडू सहभागी होणार आहेत.
धवन पंजाबचा कर्णधार?
शिखर धवनकडे पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ३६ वर्षीय धवनला पंजाबने लिलावादरम्यान ८.२५ कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील केले. ‘‘धवनच्या रूपात अनुभवी खेळाडूचा संघात समावेश केल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्हाला आमचा कर्णधार मिळाला आहे. पुढील आठवडय़ाभरात याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल,’’ असे पंजाबच्या संघ व्यवस्थापनातील सदस्याने सांगितले.