भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका ३-० अशी जिंकली. आता भारतीय संघाची नजर कसोटी मालिकेवर असेल. पहिली कसोटी २५ ऑक्टोबर रोजी कानपूरमध्ये होणार आहे. मात्र, त्याआधीच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांवर शाब्दिक बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. चेतेश्वर पुजाराने सामन्यात शतक झळकावणार असल्याचे म्हटले होते. आता रॉस टेलरने न्यूझीलंडकडून मोठे वक्तव्य केले आहे. त्याचे हे विधान भारतातील न्यूझीलंड संघाच्या ३३ वर्षांच्या इतिहासाशी संबंधित असून हा इतिहास बदलण्याचे त्याने ठरवले आहे.
न्यूझीलंड संघाने गेल्या ३३ वर्षांपासून भारतीय मैदानावर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. १९८८ मध्ये त्यांनी भारतातील शेवटची कसोटी जिंकली होती. मात्र, त्यानंतर त्यांना भारतातील सर्व दौऱ्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. रॉस टेलरला आता भारतीय संघावर विजय मिळवून हा खेळ संपवायचा आहे. रॉस टेलरने एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, “आमची तयारी आतापर्यंत व्यवस्थित झाली आहे. आमच्या संघातील प्रत्येक फलंदाज फिरकीविरुद्ध सराव करत आहे. फिरकीपटूंविरुद्ध आमच्या फलंदाजांनी अनेक षटके खेळली आहेत. आम्ही आमचे आक्रमण आणि बचाव या दोन्हींवर काम केले आहे. खेळपट्टीवर स्थिरावणे गरजेचे असेल, पण गोलंदाजांवर दबाव आणण्यासाठी आक्रमक खेळ दाखवणे आवश्यक आहे.”
कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी योग्य मानली जाते. अशा स्थितीत अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल हे न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतात. मागच्या वेळी कानपूरमध्ये अश्विन आणि जडेजा विरुद्ध न्यूझीलंड संघ मैदानात उतरला होता, तेव्हा न्यूझीलंड संघाने दोघांसमोर सहज गुडघे टेकले होते. जडेजाने पहिल्या डावात ५ बळी घेतले. तर अश्विनने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले होते.
सन १९५५ मध्ये न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा भारताचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांना एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दरम्यानच्या काळात खेळल्या गेलेल्या ३४ कसोटींमध्येही न्यूझीलंड संघाला केवळ २ कसोटी सामने जिंकता आले आहेत, तर १६ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. न्यूझीलंड संघाने २०१२ आणि २०१६ साली भारताचा दौरा केला होता. यात त्यांना एकही विजय मिळवता आला नव्हता.