औरंगाबाद (प्रतिनिधी): शहरातील दोन क्रीडांगणावर सुरु असलेल्या ब्राम्हण प्रियमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा समारोप रविवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आला. अटीतटीच्या लढतीत युनिव्हर्सल इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी वज्र इलेव्हनला नमवून विजेतेपदाचा गवसणी घातली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा एन-२ मैदानावर मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
किताबी लढतीत वज्र इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण निवडले. धावांचा आकडा फार पुढे न जाऊ देता वज्र इलेव्हन संघाने प्रतीस्पर्धी युनिव्हर्सल इलेव्हनला १० षटकांत ६ बाद ५९ धावांवर रोखले. सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या विद्येश निंभोरकरने अंतिम सामन्यात ३२ चेंडू खेळात ३९ धावांचे योगदान दिले. गोलंदाजी करताना अनिकेत लाटेने २ विकेट घेतल्या. वज्र इलेव्हन संघाने सोप्या वाटणाऱ्या आव्हानाला पार करण्यास वाटचाल सुरु केली. शेवटच्या षटकापर्यंत सामन्यातील रोमांच कायम होता. सामना संपण्यासाठी ४ चेंडू शिल्लक असताना फलंदाज अमित भालेरावचा त्रिफळा उडवला पण तरीही शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच कायम राहिला. अखेर वज्र इलेव्हन संघाचा डाव १० षटकात ६ बाद ५७ धावांवर थांबलाआणि हा सामना युनिव्हर्सल संघाने एवढ्या दोन धावांच्या फरकाने जिंकत विजेतेपदाचा गवसणी घातली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा मंगेश पळसकर, शिरीष बोराळकर, सुहास दाशरथे, आनंद तांदुळवाडीकर, गोपाळ कुलकर्णी, माधुरी अदवंत, अरविंद पाठक, दिपक कुलकर्णी, आयोजन समितीच योगेश जोगळेकर, अनिरुद्ध मोहनपूरकर यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विवेक देशपांडे, निनाद खोचे, संदीप कुलकर्णी केदार एकबोटे आदींनी परिश्रम घेतले.