अविस्मरणीय २०२१! यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील 6 खास क्षण, जेव्हा कोट्यवधी भारतीयांची उंचावली मान

कोविड १९ मुळे २०२० वर्ष पूर्णपणे वाया गेले होते. या कालावधीत सर्व काही बंद होते. ज्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झाल्याचे पाहायला मिळाले होते. २०२० उलटून गेल्यानंतर २०२१ मध्ये अनेक मोठ मोठ्या स्पर्धा पार पडल्या, ज्या २०२० मध्ये कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. याच वर्षात भारतीय खेळाडूंनी जागतिक स्तरावर घवघवीत यश मिळवलं. आता वर्षाच्या शेवटी आपण या वर्षातील काही क्षणांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.

 

 

1)ऑलिम्पिकच्या इतिहासातील ऍथलेटिक्समधील पहिलेच गोल्ड मेडल

अखेर ७ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस उजाडला. या दिवसाची संध्याकाळ ही कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. नीरज चोप्रा या अवघ्या २३ वर्षाच्या तरण्याबांड पोराने अशी कामगिरी करून दाखवली की, त्याचे मातब्बर प्रतिस्पर्धी त्याच्या आसपासही येऊ शकले नाहीत. आपल्या दुसर्‍याच प्रयत्नात ८७.५८ मीटर भाला फेकत त्याने कोट्यवधी भारतीयांची स्वप्नपूर्ती केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ऍथलेटिक्समधील पहिलेच मेडल आणि तेही गोल्ड हा दुग्धशर्करा योग साजरा झाला.

ज्यावेळी नीरज पोडियमवर मध्यभागी उभे राहून, गळ्यामध्ये चमचमणारे गोल्ड मेडल घालून उभा राहिला होता आणि समोर भारताचे राष्ट्रगीत वाजत असताना सारा भारत आनंदाश्रू ढाळत होता. २०२१ मध्ये ‌नीरज आणि इतरांचे हे निर्भेळ यश भारताच्या क्रीडा क्षेत्रातील उज्वल भविष्याची नांदी होती.

2) भारतीय हॉकी संघाने जिंकले ऑलिम्पिक पदक
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. १९८० पूर्वीचा काळ हा भारतीय हॉकीच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. या कालावधीत भारतीय संघाने अनेक पदक मिळवले होते. परंतु १९८० नंतर भारतीय संघाला ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी तब्बल ४ दशक वाट पाहावी लागली. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने ४ शतकांचा दुष्काळ संपवत टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. भारतीय संघाने बलाढ्य जर्मनी संघाला ५-४ ने पराभूत केले होते.

3) महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी
यावर्षी पुरुष संघाने इतिहास रचला, तर महिलाही मागे नाहीत. भारताच्या महिला हॉकी संघानेही ऑलिम्पिकमध्ये धुमाकूळ घातला. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. भारतीय महिला हॉकी संघाची ही तीसरीच ऑलिंपिक स्पर्धा होती. यापूर्वी भारतीय महिला हॉकी संघाने १९८० आणि २०१६ मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला होता.

 

 

 

टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. भारताचा उपांत्य फेरीत अर्जेंटिना संघाकडून पराभव झाला. या संघाने कांस्यपदक मिळवण्यासाठीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा सामना केला. परंतु, चुरशीच्या लढतीत भारतीय महिला संघाचा ३-४ असा पराभव झाला. मात्र, या पराभवाने निश्चितच एक नवी सुरुवात झाली आहे.

4) भारतासाठी विक्रमी टोकियो पॅरालिंपिक 
भारतीय संघातील खेळाडूंनी टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १९ पदकांची कमाई केली. ज्यामध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश होता. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णपदक जिंकून इतिहासाला गवसणी घातली. ती पॅरालिंपिक स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी पहिलीच खेळाडू ठरली होती.

तसेच महिला खेळाडू भाविना पटेलने टेबल टेनिसमध्ये भारताला पहिले पॅरालिंपिक पदक मिळवून दिले. तिरंदाज हरविंदर सिंगनेही तेच केले. तिरंदाजीमध्ये पॅरालिंपिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. भारतीय बॅडमिंटनपटूंनीही अप्रतिम कामगिरी करत दोन सुवर्णपदके जिंकली.

5) मीराबाई चानूचे विक्रमी पदक
भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानुने देखील टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेत रौप्य पदक मिळवून इतिहास रचला. तिने ४९ किलो ग्रॅम वजनी गटात, रौप्यपदक मिळवून भारताला टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेतील पहिले वहिले पदक मिळवून दिले होते.या क्रीडा प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी ती दुसरीच खेळाडू ठरली.

यापूर्वी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. मीराबाईने आणखी पुढे जाऊन रौप्य पदक जिंकले. हा तो क्षण होता जो वर्षानुवर्षे भारतीय लोकांच्या आठवणींमध्ये कोरला जाईल.

 

6) किदांबी श्रीकांतचे ऐतिहासिक रौप्य पदक
तसेच वर्षाच्या सुरुवाती प्रमाणे वर्षाचा शेवटही गोड झाला. भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड सिरीजच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु अंतिम फेरीत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. हा देखील इतिहास आहे कारण या स्पर्धेत एकही भारतीय पुरुष खेळाडू अंतिम खेळला नाही आणि रौप्य पदक जिंकू शकला नाही. त्याच्या आधी प्रकाश पदुकोण आणि बी. साई प्रणीत यांनी या स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते, परंतु, ते अंतिम फेरीत पोहोचले नव्हते.

You might also like

Comments are closed.