अहमदनगर- क्रिकेटविश्वात अनेकदा विविध गोष्टी घडताना दिसतात. काही आनंद देणाऱ्या असतात, तर काही दु:ख देणाऱ्या असतात. अशी एक दुखद घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात घडली आहे. या गावातील एका तरूण क्रिकेटपटूचा सरावानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
लोकेश अर्जून ढोबळे असं मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचे नाव असून तो कोपरगावमधील गजानन नगर येथे राहात होता. तो गुरुवारी (९ डिसेंबर) शहरातील साई सिटी येथील क्रिकेट मैदानात सीजन बॉलने सराव करण्यासाठी गेला होता. तो या ठिकाणी नेहमी सराव करायचा. मात्र, गुरुवारी अचानक छातीत दुखू लागल्याची तक्रार त्याने केली.
त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, त्याची प्रकृती ढासळत गेली. त्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, पण तिथेही काही कारणात्सव त्याच्यावर उपचार होऊ न शकल्याने त्याला कोपरगामधील मानवता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने तोपर्यंत अखेरचा श्वास घेतला.
लोकेश अर्जून ढोबळे याचे २७ वय होते. इतक्या कमी वयात जीव गमवावा लागल्याने संपूर्ण अमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.यापूर्वीही अशा घटना अनेकदा समोर आल्या आहेत, ज्यात सामना सुरु असताना एखाद्या खेळाडूला हृदयविकाराचा झटका आल्याने जीव गमवावा लागला आहे.