औरंगाबाद (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंच्या उन्नतीसाठी कायम आग्रही असतात. त्यामुळे या क्षेत्रासाठी आणि शहरासाठी जे जे करावे लागेल ते मी करणार आहे. शहरात ‘खेलो इंडिया’ चे सेंटर आणू, त्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानासाठी डॉ. कराड यांनी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या माध्यमातून मराठवाड्यातील पहिला सिंथेटिक अथलेटिक ट्रॅक खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे. औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे या निमित्ताने डॉ. कराड यांचा नागरी सत्कार विभागीय क्रीडा संकुलात शनिवारी (ता. ७) सायंकाळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (ता. ७) यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राज्य कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर पाटील व कार्याध्यक्ष क्रीडामहर्षी दत्ताभाऊ पाथ्रीकर, राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष माजी आ.श्रीकांत जोशी, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सदस्य सचिन मुळे, उद्योजक विवेक देशपांडे, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कराड म्हणाले, ‘खेळासाठी आणि खेळाडूंच्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम आग्रही आहेत. येथेही खेळला चालना देण्यासाठी शहरात खेलो इंडियाचे केंद्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. याशिवाय देशी आणि परदेशी खेळांना चालना देण्यासाठी खासदार चषक स्पर्धा घेण्याची घोषणाही डॉ. कराड यांनी यावेळी केली.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आभार मानत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले, हा ट्रॅक अनेक पिढ्याना मदत करणारा ठरणार आहे. डॉ. कराड यांचा पदाचा विद्यापीठ फायदा करून घेणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी एक स्पोर्ट्स हॉस्टेल व इनडोअर स्टेडियम आवश्यक आहे. हे प्रस्ताव मंजूर द्यावेत. विद्यापीठ प्रशासन सिनेट सदस्य पंकज भरसाखळे यांच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत नवीन खेळांचा समावेश बाबाबतच्या प्रस्तावाला लगोलग मान्यता देण्यात येईल असे आश्वासनही कुलगुरू डॉ. येवले यांनी दिले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले कि, लवकरच विभागीय क्रीडा संकुल येथे देखील सिंथेटिक अथलेटिक ट्रॅक तयार केला जाणार आहे. या सुविधा शहरातील सामान्य लोकांसाठी फायदेशीर ठरतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली. सीएसआर फंडाच्या माध्यमातून शहरात अत्याधुनिक शूटिंग रेंज तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भरसाखळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्याकडे भारोत्तोलन सारख्या खेळात औरंगाबादच्या मुली आशियाई स्तरावर पदके मिळवीत आहेत. मात्र विद्यापीठात या खेळासह अन्य १२ खेळांच्या माहिलांसाठीच्या स्पर्धा होत नाहीत. या खेळाचा समावेश विद्यापीठस्तरीय स्पर्धेत करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यानंतर शहरातील सर्व क्रीडा संघटनांनी डॉ. भागवत कराड यांचा वैयक्तिक सत्कारही केला. कार्यक्रमापूर्वी बॉक्सिंग, तायक्वांडो, मल्लखांब, योगासने, वूशु, मल्लखांब, स्केटिंग आदी खेळाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य डॉ. उदय डोंगरे, राज्य स्क्वाश संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, राज्य खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, विद्यापीठ क्रीडा विभाग संचालक डॉ. रंजन बडवणे, अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, ऍड.बाळासाहेब वाघमारे, भिकन आंबे, सुरेश मिरकर, मंजितसिंग दरोगा, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.