औरंगाबाद(प्रतिनिधी) एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन व औरंगाबाद जिल्हा हौशी थ्री ऑन थ्री बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित जिल्हा अजिंक्यपद थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत चॅम्पियन क्रीडा मंडळ, एमएसएम बास्केटबॉल संघ, स्वाभिमान क्रीडा मंडळ आणि जेएएसई संघांनी विजेतेपद पटकावले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर झालेल्या स्पर्धेत १०,१३, १६, १८ व २० वर्षाखालील वयोगटात ६२ संघांमधून एकूण २५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट म्हणजे प्रथमच १० वर्षाखालील मुलामुलींसाठी स्पर्धा घेण्यात आली, ज्याला खेळाडूंनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत भरपूर आनंद लुटला.
शौर्य, भावेशने चॅम्पियनला जिंकवले :
मुलांच्या १० वर्षाखालील गटात फायनलमध्ये औरंगाबाद चॅम्पियन क्रीडा मंडळाने एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स संघाचा ११-५ बास्केट गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. चॅम्पियनच्या शौर्य ढंगारेने सुंदर असिस्ट मेकरची भूमिका बजावत अचूक बास्केट केले. त्याचबरोबर भावेश दर्श, देवांश सलामपुरे, रोहन पुंड यांनी संघाला विजय मिळवून दिला. उपविजेत्या एमएसएमकडून गौरव तत्तापूरे, अथर्व दगडीया, आरव भंडारी, अर्णव भंडारी चांगली लढत दिली.
जेएएसईने गुरुकुलला हरवले :
मुलींच्या १० वर्षाखालील गटात जेएएसई संघाने गुरुकुल बास्केटबॉल अकादमीच्या संघाला ७-५ बास्केटने हरवत जेतेपद मिळवले. जेएएसईच्या परिशी जैन, अधिरा नवले, अनन्या जाधवने सुंदर असिस्ट केले. गुरुकुलच्या सान्वी डोमकोंदुर्वार, पलक्ष कुलकर्णी, अनुश्री इंगळे यांचे प्रयत्न अपुरे पडले.
रोमांचक लढतीत एमएसएम विजयी :
मुलांच्या १३ वर्षाखालील गटात एमएसएम संघाने औरंगाबाद चॅम्पियन संघावर १४-१२ अशा अवघ्या २ गुण फरकाने रोमहर्षक विजय मिळवत अजिंक्यपद राखले. एमएसएमच्या आदित्य शेलार, आदित्य खांडेकर व तेजस पाटीलने अफलातून ताळमेळ व अचूक पासेसच्या जोरावर संघास विजयी केले, तर उपविजयी ठरलेल्या चॅम्पियनतर्फे जय गुप्ता, आदेश पाटील, सागर तायडे, व साई वझरकर यांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मुलींच्या अंतिम लढतीत औरंगाबाद चॅम्पियनने प्रथम क्रमांक, तर गुरुकुल बास्केटबॉल अकदमीने दुसरा क्रमांक मिळवला.
नरेंद्र, जय, गायत्री, प्रांजली अष्टपैलू कामगिरी :
मुलांच्या १८ वर्षाखालील गटात औरंगाबाद चॅम्पियन संघाने सलग दोन सामने जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, चॅम्पियन संघातर्फे नरेंद्र चौधरी, जय कासारे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले, तर उपविजेत्या एमएसएमकडून प्रणव कोळेश्वर, पार्थ शेलार, संतोष कांठोले, अनुराग हिरे यांनी चांगला खेळ केला. मुलींमध्ये एमएसएम संघाने पोद्दार सीबीएसई संघाचा अटीतटीच्या लढतीत ६-४ बास्केटच्या फरकाने पराभव अजिंक्यपद मिळवले. सामन्यात गायत्री दगडीया, प्रांजळ अतकरे, दिशा भाटी, रितू त्रिभुवन, इशिता खंबाट, मुदिता रगडे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
विजयी हॅटट्रिकसह चॅम्पियन ठरला चॅम्पियन :
मुलांच्या २० वर्षाखालील गटात औरंगाबाद चॅम्पियन संघाने सलग तीन सामने जिंकत चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. एमएसएम संघ दोन सामने जिंकून उपविजेता ठरला. विजयी चॅम्पियन संघातर्फे जयराज तिवारी, नरेंद्र चौधरी, रोहित परदेशी व प्रग्यात पगारीया यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले, तर उपविजेता ठरलेला एमएसएम बास्केटबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड, प्रेम मिश्रा, यश वाघमारे अनिस साहूजी यांचे प्रयत्न अपुरे पडले.
विजेत्या संघांना आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड, चॅम्पियनचे सचिव संदीप ढंगारे, राजू कणीसे, गणेश तुपे, विवेक देशमुख यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व चषक देवून गौरवण्यात आले.