औरंगाबाद (प्रतिनिधी); मास्टर्स ग्रुप ऑफ बास्केटबॉलच्या वतीने बेगमपुऱ्यातील विद्युत कॉलनी बास्केटबॉल मैदान सुरू असलेल्या दुसऱ्या मास्टर्स ट्रॉफी २०२२ मध्ये चॅम्पियन संघाने एसएफएस संघाचा ७०-५१ बास्केट गुणांनी पराभव करत विजयी सलामी दिली. स्पर्धेत २५ ते ४० वयोगटातील जवळपास १०० पुरूष खेळाडू सहभागी झाले आहेत. शाळा-महाविद्यालयानंतर खेळाडूंना स्पर्धा नसते. अशा मध्यम वयोगटातील खेळाडू मैदानापासून दूर जावू नये, यासाठी या मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
साखळी सामन्यात चॅम्पियन संघाने एसएफएसला १९ गुणांनी मात दिली. विजयी संघातर्फे भारतीय सेनेचा खेळाडू गणेश गायके, अखिल भारतीय विद्यापीठ खेळाडू अनिरुद्ध पांडे, महेश इंगळे, अल्केश डोंगरे आणि अंकुश सोनी यांनी अफलातून खेळ करत अचूक पासेसच्या जोरावर विजयश्री खेचून आणली. पराभूत संघातर्फे धवल मोरे, अक्षय देवकर, विशाल बकाल आणि अनिकेत पवार यांनी कडवी झुंज दिली.
स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक रोहित सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ अशोक नवले, बंडू खरे, वरिष्ठ खेळाडू संदीप क्षीरसागर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे, प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, सचिन म्हस्के, अजय सोनटक्के आणि गोविंदा साखरे यांची उपस्थिती होती. या समारंभाचे प्रास्ताविक संदीप ढंगारे यांनी केले, तर सूत्रसंचालन भार्गव कुलकर्णी यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजू कणीसे, महेश इंगळे, मोसिन पठाण, प्रदीप लाटे, नरेंद्र चौधरी, जय तिवारी आणि सागर धटींग आदी प्रयत्नशील आहेत.