औरंगाबाद (प्रतिनिधी):गरवारे क्रिकेट संकुलावर सुरू असलेल्या कास्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ३० व्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात कम्बाईन बँकर्स ब संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ब संघावर ४७ धावांनी विजयी मिळवला. दुसऱ्या सामन्यात एमजीएम अ संघाने जॉन्सन संघावर ५ गडी राखून विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात संदीप राजपूत आणि अमित पाठक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
पहिल्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बँकर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद १४९ धावा केल्या. सलामीवीर कुणाल फलकने ३१ चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह सर्वाधिक ४४ धावा काढल्या. संदीप राजपूतने ३२ चेंडूंत २ षटकार व ३ चौकार खेचत ४२ धावा तर सचिन शिरसाठने २५ चेंडूत १ षटकार व ५ चौकारांसह ३६ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय संघातर्फे गोलंदाजी करताना आकाश जमधडेने २१ धावात ३ गडी, शोएब शेखने ३० धावांत ३ गडी आणि सादिक पटेलने २८ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाचा डाव १७ षटकात अवघ्या १०२ धावांवर ढेपाळला. पार्थ महाडिकने २७ चेंडूत ४ चौकारांसह ३१ धावा, अब्दुल कय्यूमने १६ चेंडूत ४ चौकारासह २० धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. बँकर्सच्या हरमितसिंह रागीने भेदक गोलंदाजी करत केवळ ११ धावांत ३ महत्त्वपूर्ण गडी टिपले. निखिल मुरूमकर व कर्णधार श्याम लहानेने प्रत्येकी दोन बाद केले.
अमित पाठकची अष्टपैलू कामगिरी :
दुसऱ्या सामन्यात अमित पाठकच्या (४ बळी, ५२ धावा) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमजीएमने विजय मिळवला. जॉन्सन संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १४ षटकात सर्वबाद १०७ धावांत ढेपाळला. अष्टपैलू प्रवीण क्षिरसागरने १९ चेंडूत ३ षटकार व ३ चौकारांसह ३७ धावा, अमर यादवने १४ चेंडूत ५ चौकारांसह २३ धावा तर निरज शिमरेने १६ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २० धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही. एमजीएमतर्फे अमित पाठकने धारधार गोलंदाजी करत १२ धावांत ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. रहीम खानने ८ धावात २ व विनोद यादवने १७ धावात २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमजीएम ‘अ’ संघाने १२ षटकांत ५ गडी गमावत विजयी लक्ष गाठले. अष्टपैलू अमित पाठकने धडाकेबाज फलंदाजी करताना केवळ २४ चेंडूत ७ उत्तुंग षटकार व १ चौकार लगावत ५२ धावांची विजयी खेळी केली. सय्यद जलीसने १२ चेंडूत २ चौकारांसह नाबाद १४ धावा, मयूर जंगाळेने १७ चेंडूत २ चौकारांसह १३ धावांचे योगदान दिले. जॉन्सनतर्फे अमर यादवने १९ धावांत २ गडी तर निरस शिमरे, दीपक खानविलकर व प्रशुल माहेश्वरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.