मुंबई (प्रतिनिधी)अमर हिंद मंडळाने अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘अ’ गट पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन अमर वाडी, गोखले रोड, दादर (प.), मुंबई येथे केले आहे. आज झालेल्या सामन्यात गंधेकर एलेक्ट्रिकल्सने आर.बी.सी.ला, शिवांश एंटरप्राइजेसने साई सिक्युरिटीला व सद्गुरू एंटरप्राइजेसने रिजर्व बँकेला पराभूत करत विजयी घोडदौड कायम ठेवली.
पहिल्या सामन्यात गंधेकर एलेक्ट्रिकल्सने आर.बी.सी. स्पोर्ट्स क्लबला ४८-३९ असे ९ गुणांनी पराभूत केले. गंधेकर एलेक्ट्रिकल्सच्या दिप थरवळ चौफेर चढाई करताना १० गुण वसूल केले व दीपेश चव्हाणने उत्कृष्ट पकड करताना ५ गुण मिळवले तर आर.बी.सी. कडून खेळताना ओमकार पवारने जोरदार लढत दिली मात्र त्याला संघाला परभवापासून वाचवता आले नाही.
दुसऱ्या सामन्यात शिवांश एंटरप्राइजेसने साई सिक्युरिटीवर ४०-३२ असा ८ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात शिवांशच्या राजेश बोराडे व आदिनाथ गुले यांनी अष्टपैलू खेळ करताना साई सिक्युरिटीला जराही डोक वर काढायची संधि दिली नाही. तर साई सिक्युरिटीच्या राज नाटेकरने बहारदार खेळ करत सामन्यावर छाप पाडायचा प्रयत्न केला. मात्र तो काही आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
तिसरा व उपउपांत्य फेरीचा पहिला सामना सद्गुरू एंटरप्राइजेसने रिजर्व बँकेला ३३-२१ असे १२ गुणांनी पराभूत करत जिंकला. या सामन्यात सद्गुरू एंटरप्राइजेसच्या केतन कळवणकर व कुलदीप मांगणकर यांनी रिजर्व बँके विरुध्द जोरदार खेळी करताना आपल्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. तर रिजर्व बँकेच्या जयेश यादव व अशोक चव्हाण यांनी जोरदार लढत दिली मात्र ते आपल्या संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकले नाहीत.