हीच योग्य वेळ आहे कसोटी नेतृत्व सोडण्याची ;कोहली

अशा शब्दांत विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला

गेली सात वर्षे भारतीय कसोटी संघाला मेहनत, अथक परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर प्रगतीच्या दिशेने नेल्यानंतर आता थांबण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शनिवारी विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. २०१४मध्ये कसोटी संघाचे नेतृत्वपद स्वीकारणाऱ्या कोहलीने ‘ट्विटर’च्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांना हा आश्चर्याचा धक्का दिला. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमावल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वासह भारतीय खेळाडूंवर काही माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनीही ताशेरे ओढले. अखेर शनिवारी सायंकाळी कोहलीने निवृत्तीचा निर्णय जाहीर करतानाच त्याचे मनोगतही व्यक्त केले.

 

 

 

 

 

‘‘गेल्या सात वर्षांपासून भारतीय संघाचे नेतृत्व करताना मी प्रामाणिकपणे कोणत्याही बाबीची कमी पडू दिली नाही. मात्र प्रत्येक गोष्ट कधी तरी थांबली पाहिजे. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठीसुद्धा थांबण्याची हीच योग्य वेळ आहे, असे कोहलीने निवेदनात नमूद केले आहे .या प्रवासात असंख्य चढ-उतारांना सामोरे जावे लागले. परंतु यामुळे माझे प्रयत्न कधीही कमी झाले नाहीत. कोणतेही कार्य करताना १२० टक्के योगदान देण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र तसे न जमल्यास मी स्वत:सह संघाचीही फसवणूक केल्यासारखे होईल. त्यामुळे मनात पूर्ण स्पष्टता बाळगूनच मी हा निर्णय घेत आहे,’’ असेही कोहलीने म्हटले.

 

 

याव्यतिरिक्त कोहलीने बीसीसीआय, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, संघ सहकारी आणि माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचे विशेष आभारही मानले. ‘‘माझ्यातील नेतृत्वगुणाला हेरल्याबद्दल तसेच भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला पात्र समजल्याबद्दल धोनीचा मी सदैव ऋणी राहीन,’’ अशा शब्दांत कोहलीने निवेदनाचा शेवट केला.

You might also like

Comments are closed.