औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील अविस्मरणीय कामकाजावर महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील अनमोल योगदानावर आधारित ही पहिलीच पीएच. डी. आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय असे आहे. कुस्ती, कबड्डी, खोखो हा महाराष्ट्रातीत पारंपरिक खेळांच्या पाठीशी शरद पवार हे खंबीरपणे उभे राहिले. या खेळास त्यांनी देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून दिली. बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून अन्य खेळांना कशी मदत होईल याचा सातत्याने पाठपुरावा केला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे क्रीडा व्यवस्थापन हा अभ्यासाचाच विषय आहे. त्यांचे क्रीडा व्यवस्थापनाने भारावून गेलेले डॉ. खांड्रे यांनी शरद पवार यांचे क्रीडा क्षेत्रातीतल योगदानावर पीएच. डी. करण्याचा निर्णय घेतला. तब्बल पाच वर्षे संशोधन करुन त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. ही देशातील शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानावरील पहिलीच पीएच. डी. आहे हे विशेष.
डॉ. प्रदीप खांड्रे हे महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष असून बॉक्सिंग, हॉकीसह ते विविध क्रीडा संघटनांशी ते संबंधित आहेत. नेमबाजी व हॉकी या दोन्ही खेळांत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधीत्त्व केलेले आहे. खेळाडू असल्यापासून प्रदीप खांड्रे यांना शरद पवारांच्या क्रीडा क्षेत्रातील व्यवस्थापनाविषयी प्रचंड कुतूहल होते. पीएच. डी. करण्यासाठी त्यांनी शरद पवार यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान हा विषय निवडला. त्यासाठी त्यांना डॉ. पी. आर. रोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षे संशोधन व विविध गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी पीएच. डी. पूर्ण केली.
शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील व्यवस्थापनावर पीएच. डी. पूर्ण केल्यानंतरचा अनुभव सांगताना डॉ. प्रदीप खांड्रे म्हणाले, ‘क्रीडा क्षेत्रातील शरद पवार साहेबांचे योगदान हे कधीही विसरता येणारे नाही. कबड्डी, कुस्ती, खोखो तसेच क्रिकेट या खेळांचे व्यवस्थापन त्यांनी अनेक वर्षे केले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेले आहेत. साहजिकच राज्यात विविध खेळांचे वातावरण तयार करण्यासाठी, आधुनिक क्रीडा सुविधांची उभारणी, खेळाडूंच्या पाठीशी सदैव राहाणारे पवार यांचे कार्याची पीएच. डी. रुपाने नोंद घ्यावी असे सतत मनात होते आणि आता पीएच. डी. पूर्ण झाली याचा मोठा आनंद आहे. वीस जून २०१६ रोजी औरंगाबादेत शरद पवार यांची भेट घेतली. जवळपास पंचवीस मिनिटांच्या भेटीत त्यांना पीएच. डी. विषयी कल्पना दिली. त्यांची मुलाखत देखील घेतली. या मुलाखतीत त्यांनी काही मोलाच्या सूचना केल्या. या सूचनांचा मोठा फायदा मला पीएच. डी. करताना झाला. दिल्ली येथे पवार यांची भेट घेऊन त्यांना पीएच. डी. पूर्ण केल्याबद्दल माहिती दिली. त्यांनी माझे कौतुक केले. राजकीय घडामोडींच्या धावपळीत त्यांनी मला भेटीची वेळ दिली आणि भेट इतकी छान झाली की मला पाच वर्षांच्या संशोधनाचे चीज झाल्याचे मोठे समाधान वाटले.डॉ.खांड्रे यांची ही दुसरी पीएच. डी. आहे. यापूर्वी त्यांनी आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत खेळाडूंवर आधारित संशोधन करुन पीएच. डी. पदवी संपादन केली होती. ही पीएच. डी. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून केली होती.डॉ. खांड्रे यांना शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानावर आधारित पीएच. डी. पदवी संपादन करण्यासाठी गाइड डॉ. पी. आर. रोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
याविषयी डॉ. पी. आर. रोकडे म्हणाले, ‘महाराष्ट्रातच नव्हे तर देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान न भुतो न भविष्यती असेच आहे. शरद पवार यांचे क्रीडा व्यवस्थापन क्रीडा संघटनांसाठी नेहमीच प्रेरणादायी असते. याच भूमिकेतून डॉ. खांड्रे यांनी हा विषय निवडला. भावी पिढीला हे संशोधन नक्कीच मार्गदर्शन ठरणारे आहे. खांड्रे यांची पीएच. डी.पाच वर्षे संशोधन, पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याचा खांड्रे यांचा मानस आहे.