जिल्हा क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलणार-पालकमंत्री राजेश टोपे.

क्रीडा संकुलाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून भरीव तरतूद

जालना(प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यात विविध खेळांना अधिक प्रमाणात चालना मिळावी.जिल्ह्यातून गुणवत्तापूर्ण खेळाडू निर्माण होऊन जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलत या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

29 व्या राज्यस्तरीय ज्युनियर फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेचे पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भास्कर दानवे, क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, नंदू जांगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात खेळाचे वातावरण वाढून गुणवत्तापूर्ण पूर्ण खेळाडू तयार व्हावेत,खेळाला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने क्रीडा संकुलाच्या विकास कामांचे नियोजन करण्यात आले असून या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

फेन्सिंग या खेळामध्ये वेग आणि एकाग्रता या दोन गोष्टींची आवश्यकता असते. या खेळात खेळाडूंनी आपल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवत अत्यंत चांगल्या पद्धतीने या खेळात यश संपादन करावे. अरुण या खेळात जिल्ह्यातील मुला-मुलींनी येण्याची गरज असून या खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षक व साहित्याची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगत या खेळाला राजाश्रय मिळण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.

या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 350 च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे.

You might also like

Comments are closed.