टी२० विश्वचषक २०२१ च्या पात्रता फेरीत सहभागी झालेल्या स्कॉटलंडच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तसेच, लोकांना स्कॉटलंड संघाची टी२० विश्वचषक जर्सी खूप आवडत आहे. ही जर्सी जांभळ्या रंगाची आहे, ज्याची रचना एकदम अनोखी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्कॉटलंडची ही अधिकृत जर्सी १२ वर्षांच्या मुलीने तयार केली आहे.
स्कॉटलंडच्या हॅडिंग्टन या शहराची मूळ रहिवासी १२ वर्षीय रेबेका डाउनी, हिने या जर्सीची रचना केली आहे, ज्याला सोशल मीडियापासून क्रिकेटजगतापर्यंत चांगली पसंती मिळत आहे.
स्कॉटलंडने ट्विटरवर रेबेका डाऊनीचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. रेबेका डाउनीने स्कॉटलंडचा पहिला सामना पाहिला आणि तिचा हा फोटो स्कॉटलंडच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड करण्यात आला आहे. स्कॉटलंड क्रिकेटने ट्विट करत माहिती दिली, ‘स्कॉटलंड क्रिकेट संघाच्या जर्सीची रचना करणाऱ्या १२ वर्षीय रेबेका डाऊनीने स्वतः ती जर्सी परिधान करून संघाचा पहिला सामना पाहिला आणि संघाचे मनोबल वाढवले आहे. आम्ही तुझे पुन्हा आभार मानतो.’
Scotland's kit designer 👇
12 year-old Rebecca Downie from Haddington 👋
She was following our first game on TV, proudly sporting the shirt she designed herself 👏
Thank you again Rebecca!#FollowScotland 🏴 | #PurpleLids 🟣 pic.twitter.com/dXZhf5CvFD
— Cricket Scotland (@CricketScotland) October 19, 2021
स्कॉटलंडमधील २०० शाळांमध्ये मुलांना राष्ट्रीय संघासाठी जर्सी डिझाईन करण्यास सांगण्यात आले होते. हजारो मुलांनी त्यांची रचना सादर केली होती. पण रेबेकाने बनवलेली रचना निवडली गेली. लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रेबेकाच्या या प्रतिभेला सलाम केला आहे आणि इतर देशांना अशी मोहीम सुरू करण्यास सांगितले आहे.
स्कॉटलंडने बांगलादेश क्रिकेट संघाचा ६ धावांनी पराभव करून स्पर्धेतील एक प्रमुख सामना जिंकला आणि सुपर -१२ मध्ये प्रवेश करण्याची त्यांनी चांगली संधी निर्माण केली आहे. स्कॉटलंड आज आपला दुसरा सामना पापुआ न्यू गिनीविरुद्ध खेळणार आहे. जर स्कॉटलंड संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी झाला, तर संघ सुपर-१२ मध्ये थेट प्रवेश मिळवण्यात यशस्वी होऊ शकतो. स्कॉटलंडचा पुढील सामना या गटातील आणखी एक सर्वोत्तम संघ ओमानशी होणार आहे.