केपटाऊन – क्वीन्सटाउन येथे खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० सामन्यात न्यूझीलंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा १८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात भारताचा महिला संघ ८ विकेट गमावून केवळ १३७ धावाच करू शकला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो चुकीचा ठरला. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ७.५ षटकांत ६० धावांची उत्कृष्ट भागीदारी केली.
सुझी बेट्सने ३६ तर कर्णधार सोफी डिव्हाईनने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. मधल्या फळीत अमेलिया कारने १७ आणि मॅडी ग्रीनने २६ धावा केल्या. याशिवाय ली तैहूनेही १४ चेंडूत २७ धावांची शानदार खेळी खेळली. भारताकडून पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २ बळी घेतले.