चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनासाठी रस दाखवला नाही. रैनासाठी इतर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्यामुळे चिन्नाथालाच्या चाहत्यांचीही निराशा झाली. मात्र आता रैना आयपीएल २०२२मध्ये दिसणार असल्याची चिन्हे आहेत. रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलच्या या हंगामात पदार्पण करत असलेल्या गुजरात टायटन्स फ्रेंचायझीच्या जर्सीत दिसत आहे
इंग्लिश सलामीवीर फलंदाज जेसन रॉयने आयपीएलच्या या हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे. त्यानंतर रॉयच्या जागी रैनाच्या संघात प्रवेश करण्याबाबत चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चाहते टायटन्सच्या जर्सीसह रैनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
गुजरात टायटन्सचा संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये उतरणार आहे. या संघात राशिद खान, मोहम्मद शमी, शुबबमन गिल या खेळाडूंचा समावेश आहे.
जेसन रॉयने दीर्घकाळ बायो बबलमध्ये राहिल्यामुळे आलेल्या थकव्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली. याआधी रैनाने आयपीएलमध्ये गुजरातच्या फ्रेंचायझीचे नेतृत्व केले आहे. जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर स्पॉट फिक्सिंगमुळे दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी गुजरात लायन्सने आयपीएलमध्ये दोन वर्षांसाठी प्रवेश केला होता. रैनाने लायन्सचे नेतृत्व केले होते.