मुंबई – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या २६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचा २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये आस्वाद घेता येणार आहे. मात्र त्यासाठी दोन लसींचे बंधन असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)BBCI आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रतिनिधींशी बुधवारी झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.
करोना परिस्थितीचा आढावा घेऊन ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकसंख्या वाढवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ‘बीसीसीआय’चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमिन, मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस आयुक्त संजय पांडे, मुंबई प्रीमियर लीगच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.