नवी दिल्ली-सोफिया (बल्गेरिया) येथे चालू असलेल्या स्ट्रँडजा बॉक्सिंग स्पर्धेत नंदिनीने (८१ किलो वजनी गट) कझाकस्तानच्या व्हॅलेरिया अॅक्सेनोव्हाला नमवून उपांत्य फेरी गाठताना भारताचे पहिले पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत नंदिनीची कझाकस्तानच्या माजी विश्वविजेत्या लाझत कुनगेबायेव्हाशी गाठ पडणार आहे.
याशिवाय युवा विश्वविजेती अरुंधती चौधरी (७० किलो) आणि प्रवीण (६३ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अरुंधतीने जर्मनीच्या मेलिसा जेमिनीला ३-० असे नामोहरम केले. तर प्रवीणने कझाकस्तानच्या एडा अबिकेयेव्हावर ५-० असा दिमाखदार विजय मिळवला.
मीना राणी (६० किलो), अंजली तुशिर (६६ किलो), सावीती (७५ किलो) आणि सचिन कुमार (८० किलो) यांनी आपापल्या लढती गमावल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. रशियाच्या न्युने एसॅट्रियनकडून मीनाने २-३ अशी हार पत्करली. रशियाच्याच सादत दालगातोव्हाने अंजलीला ५-० पराभूत केले. सर्वात अनुभवी सावीती फ्रान्सच्या डॅव्हिना मिशेलकडून ०-५ अशा फरकाने पराभूत झाली. सचिननने जर्मनीच्या सिल्व्हिओ शिर्लेकडून १-४ अशी हार पत्करली.