कोल्हापूर(प्रतिनिधी):-राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी. या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात फेन्सिंग (तलवारबाजी) साठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करण्यात येणार आहेत. या हॉलसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले.
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात छत्रपती शाहू महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील अभिमत विद्याठिाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, शिवाजी विद्यापिठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्याठिाचे प्र-कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, फेन्सिंग असोसिएशनचे सचिव उदय डोंगरे, फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधारे, फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार राजकुमार सोमवंशी, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे सचिव विनय जाधव यांच्यासह फेन्सिंग मार्गदर्शक, रेफरी व खेळाडू उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोव्हिडनंतर आता स्पर्धा सुरु झाल्या आहेत. कोल्हापूर ही शौर्याची भूमी आहे. या भूमित फेन्सिंग(तलवारबाजी) राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा सन्मान जिल्ह्याला लाभला आहे. कोल्हापुरातील या स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी राज्याची टीम तयार होणार आहे, हा अभिमान कोल्हापुरकर म्हणून मोठा आहे. या स्पर्धेतून 24 खेळाडूंची निवड पटियाला येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडली जाणार आहे. राज्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकविण्यासाठी खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवावे. या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्रला सांघिक व वैयक्तिक गटात विजतेपद मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फेन्सिंगला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी असोसिएशनमार्फत पुढील काळात प्रयत्न केले जाणार आहेत. कोणताही होतकरु खेळाडू आर्थिक समस्येमुळे मागे राहणार नाही. त्याच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशा खेळाडूस असोसिएशनमार्फत दत्तक घेतले जाईल. फेन्सिंग खेळाडूंच्या पाठीमागे असोसिएशन खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही पाटील यांनी दिली. फेन्सिंग खेळाचा विकास करण्यासाठी चांगल्या योजना राबविण्यात येतील. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व खेळाडूंनी आपल्या सूचना असोसिएशनकडे पाठवाव्यात.
पालकमंत्री पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यातील क्रीडा संघटनांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. असा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, तलवारबाजी हा पारंपरिक पद्धतीने खेळला जाणारा खेळ आता आधुनिक पद्धतीने खेळला जात आहे. फेन्सिंगमध्ये राज्यातून ऑलम्पिकसाठी खेळाडू घडावेत, यासाठी शासनाने खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के व डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल यांनीही मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव उदय डोंगरे यांनी प्रास्ताविकात फेन्सिंग स्पर्धेबाबतची माहिती दिली. या स्पर्धेत 450 खेळाडूंनी नावनोंदणी केली असून यामधून अखिल भारतीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ निवड केली जाणार आहे. स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी आभार मानले.