लंडन –फिफा’ने रशियन फुटबॉल संघाला विश्वचषक पात्रतेतून थेट बाद न केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.युक्रेनवर हल्ले घडवणाऱ्या रशियावर युरोपातील महासत्तांकडून सध्या चोहीकडून टीकास्त्र सोडले जात आहेत. रशियाने गेल्या गुरुवारपासून युक्रेनमधील विविध शहरांवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षांत युक्रेनला मोठय़ा जीवितहानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्या सामान्य नागरिकांवरही शस्त्रे उचलून आपल्या देशासाठी लढण्याची वेळ आली. त्यामुळे युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाला आता जगभरातून निषेध दर्शवण्यात येत असून विविध क्रीडा संघटनांनीही आता त्यांची कोंडी करण्यास प्रारंभ केला आहे.
रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत वापरण्यास बंदी-
जागतिक फुटबॉल महासंघ ‘फिफा’ने रशियन संघाला यापुढे रशिया फुटबॉल संघटना’ या नावाखाली खेळण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संघाला रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत वापरण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. या संघाचे सामने रशियाऐवजी त्रयस्थ ठिकाणी खेळवले जातील. आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, युएफा आणि अन्य जागतिक क्रीडा संघटनांशी सातत्याने संवाद साधत आहोत. या चर्चेनुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ, असेही ‘फिफा’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आंतरराष्ट्रीय ज्युडो महासंघाचे (आयजेएफ) मानद अध्यक्षपद तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची ‘आयजेएफ’ने नमूद केले. पुतिन यांना ज्युडो या खेळात विशेष रस असून त्यांनी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये या खेळाच्या सामन्यांना हजेरी लावली होती. त्यांना २००८ साली ‘आयजेएफ’चे मानद अध्यक्षपद लाभले होते.
जागतिक बॅडिमटन संघटनेने (बीडब्ल्यूएफ) आपल्या रशिया आणि बेलारूस येथे होणाऱ्या आगामी स्पर्धा रद्द करण्याचा सोमवारी निर्णय घेतला. बीडब्ल्यूएफ’च्या मान्यताप्राप्त स्पर्धामध्ये रशिया आणि बेलारूसचे ध्वज, तसेच त्यांच्या राष्ट्रगीतावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत या दोन्ही देशांत बॅडिमटन स्पर्धाचे आयोजन करण्यासही ‘बीडब्ल्यूएफ’ने मनाई केली आहे. रशियन सैन्याने बेलारूसमार्गे युक्रेनमध्ये शिरकाव केल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘बीडब्ल्यूएफ’ने दोन्ही देशांवर कारवाई केली.