भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेसाठी (India vs South Africa) आमनेसामने आले आहेत. उभय संघांमधला पहिला एकदिवसीय सामना आज १९ जानेवारीला पार्लच्या बोलंड पार्कवर खेळवला जात आहे. या मालिकेत दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. अलीकडेच, दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा २-१ असा पराभव केला. एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाची कमान सांभाळेल. टेंबा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे, आज त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुलने या सामन्यात व्यंकटेश अय्यर वनडे पदार्पण करणार असल्याचे सांगितले. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून अय्यरने चमकदार कामगिरी केली. सहावा गोलंदाज म्हणूनही तो संघात योगदान देईल.
क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. पण भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने मलानला मोठी खेळी करू दिली नाही. अवघ्या ६ धावांवर मलान तंबूत परतला.
विराटकडे लक्ष-
या सामन्यात विराट कोहली फलंदाज म्हणून कशी छाप पाडतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या सात वर्षांत प्रथमच कोहलीवर नेतृत्वाची जबाबदारी नसली, तरी नवा कर्णधार के. एल. राहुलसाठी त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमवावी लागली. त्यानंतर कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. डिसेंबरमध्ये त्याची एकदिवसीय संघाच्या नेतृत्वपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली.
रबाडा बाहेर-
आफ्रिकेचा घातक गोलंदाज कगिसो रबाडा भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेणार नाही. त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने विश्रांती दिली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) एका निवेदनात म्हटले, “वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला भारताविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याने पूर्णपणे ताजेतवाने व्हावे, अशी आमची इच्छा आहे.”
भारत व दक्षिण आफ्रिका प्लायेर्स –
भारत : केएल राहुल (कर्णधार) , शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक ( यष्टीरक्षक), जानेमन मलान, एडन मार्कराम, रुसी व्हॅन डर डुसेन , टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जानसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.