“सर, मुझे एक दिन इंडिया के लिए खेलना है | मोहम्मद उस्मान सुलतान अन्सारी आज त्याचे स्वप्न साकार होत आहे

मुंबई,(दिलीप अहिनवे )- बृहन्मुंबई महानगरपालिका मनपा शाळेचा माजी विद्यार्थी मोहम्मद उस्मान सुलतान अन्सारी याने राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे दुबई येथे होणाऱ्या एशियन युथ ॲण्ड ज्युनिअर बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पात्र ठरला. ही त्याची पहीली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. तेथे त्याने चांगली कामगिरी केली. मुंबई महापालिकेचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. मनपा शारीरिक शिक्षण विभागातील शारीरिक शिक्षण शिक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, प्राचार्य व वरिष्ठ पर्यवेक्षक यांच्या प्रचंड मेहनतीमुळे मुंबई महापालिकेचा झेंडा सातासमुद्रापार झळकत आहे.
मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू उस्मान अन्सारी व मार्गदर्शक शिक्षक रघुनाथ दवणे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. याप्रसंगी मनपा वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी व अनुभवी कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी हे उपस्थित होते.
मनपा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षणाधिकारी स्वतः नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. त्यासाठी ते स्वतः प्रयोग करुन मनपा शाळांचा पट वाढविण्यासाठी शिक्षक व अधिकाऱ्यांना आवाहन करत असतात.
शारीरिक शिक्षण शिक्षक रघुनाथ दवणे यांनी सन २०१३ मध्ये शाळेतील स्पोर्ट्स सेंटर मध्ये बॉक्सिंग खेळाला सुरुवात केली. त्यांनी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वेळ देऊन खेळाडू घडवले. त्या केंद्रातील ३ खेळाडूंची स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियासाठी निवड झाली. सध्या भारतासाठी ते खेळत आहेत.
२६ ते ३१ जुलै या कालावधीत हरयाणा राज्यातील सोनिपत येथे भारतीय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ४८ ते ५० कि. वजनी गटात उस्मानने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर २१ ते ३० ऑगस्ट दरम्यान दुबई येथे होणाऱ्या एशियन युथ अँड ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उस्मान सहभागी झाला होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा त्याचा हा पहिला अनुभव होता.
मोहम्मद उस्मान सुलतान अन्सारी महानगरपालिकेचा माजी विद्यार्थी आहे. मदनपुरा व्होकेशनल उर्दू शाळेत त्याने प्राथमिक शिक्षण घेतले. मो. उमर रज्जब मार्ग माध्यमिक उर्दू शाळेत त्याने पुढील शिक्षण घेतले. फुटपाथवर राहणाऱ्या या विद्यार्थ्याला महापालिका शाळेतील अनुभवी शिक्षक व अधिकारी वर्गाकडुन योग्य ते मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच आज त्याची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. तो त्याचे मार्गदर्शक शिक्षक रघुनाथ दवणे यांना म्हणाला होता की, “सर, मुझे एक दिन इंडिया के लिए खेलना है | आज त्याचे स्वप्न साकार होत आहे.सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या सलग चार वर्षात शालेय राज्यस्तर स्पर्धेत उस्मानने रौप्यपदक पटकावले होते. सन २०१७-१८ मध्ये मुंबई येथे झालेल्या शालेय राज्यस्तर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सन २०१७-१८ मध्ये वाराणसी येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवले. सन २०१८-१९ मध्ये दमण येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सन २०२०-२१ मध्ये हरयाणा येथे पार पडलेल्या ज्युनिअर ॲण्ड गर्ल्स चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सन २०२०-२१ मध्ये एशियन युथ ज्युनिअर बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी दुबई येथे भारताचे प्रतिनिधित्व केले.उस्मान मो. सुलतान अन्सारी  भारतीय खेल प्राधिकरण (SAI), औरंगाबाद मध्ये प्रशिक्षण घेऊन तो खेळत आहे.
मुंबई महापालिकेचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी स्वत: कनिष्ठ पर्यवेक्षक असताना अंधेरी विभागात बॉक्सिंगचा पाया घातला. आज अनेक शारीरिक शिक्षण शिक्षक त्यांचे अनुकरण करत आहेत. त्यामुळे महापालिका खेळाडू बॉक्सिंग व इतर खेळात उत्तरोत्तर प्रगती करत आहेत.

You might also like

Comments are closed.