मुंबई (प्रतिनिधी) प्रथम मुंबई विभाग स्तर जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच अंधेरी येथील गुंदवली मनपा शाळा सभागृहात उत्साहात पार पडली. तीस सेकंद सिंगल बाऊन्स,तीन मिनिट एंडुरन्स इव्हेंट, सिंगल रोप डबल अंडर तीस सेकंद इव्हेंट व सिंगल रोप फ्री स्टाईल इव्हेंट अशा पाच प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. एका खेळाडुला अनेक खेळात सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
या स्पर्धेत सायन एम पी एस स्पोर्ट्स सेंटरच्या दहा खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पहिल्या चार खेळात सहभागी होऊन तेरा सुवर्ण, चार रौप्य व सहा कास्य अशी तेवीस पदकांची कमाई करत चमकदार कामगिरी केली. सायन एम पी एस संकुलाचे विजेते खेळाडू पुढील प्रमाणे : किर्ती प्रजापती तीन सुवर्ण,संध्या मंडल तीन सुवर्ण,शानवाज खान दोन सुवर्ण व एक रौप्य,कमल दमानी दोन सुवर्ण व एक कास्य,साईनाथ दुगणी एक सुवर्ण व दोन रौप्य,तमन्ना यादव एक सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य, सेजल केवट एक सुवर्ण,सुरजकुमार विश्वकर्मा दोन कास्य,मनिकंदन सानार एक कास्य,राज जोशी एक कास्य.
मुख्याध्यापक अनुप सरवदे, कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी, विभाग निरीक्षक जगदीश गायकवाड, शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी, प्रशासकीय अधिकारी (शाळा) मुख्तार शाह व वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक जगदीश सूर्यवंशी व अजय धांडे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.