श्रेयसनं तिसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ७३ धावा केल्या,भारताने तिसर्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-०ने जिंकली. या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाद करता आले नाही. तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाबाद ७३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. यासह अय्यरने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला. अय्यर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या मालिकेत त्याने तीन डावात एकूण २०४ धावा केल्या आहेत.
२०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विराट कोहलीने १९९ धावा केल्या होत्या. यापूर्वी कोहलीने २०१९मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात २८ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात अय्यरने ४५ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.
फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा १९ चेंडू आणि सहा गडी राखून पराभव केला. भारताने आता अफगाणिस्तानच्या सलग १२ टी-२० विजयाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.