रॅनिओरा (न्यूझीलंड)-आफ्रिकेविरुद्ध उपकर्णधार हरमनप्रीतने नऊ चौकारांच्या साहाय्याने १०३ धावा फटकावून सूर गवसल्याचे संकेत दिले.हरमनप्रीत कौरने (११४ चेंडूंत १०३ धावा) साकारलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारतीय संघाने रविवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दोन धावांनी निसटता विजय मिळवला.
हरमनप्रीत गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडत होती. त्यामुळे काही माजी क्रिकेटपटूंनी तिला संघातून वगळण्याचेही सुचवले. तीन दिवसांपूर्वीच न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात तिने ६३ धावांची खेळी केली. हे तिचे गेल्या १२ महिन्यांतील पहिले अर्धशतक होते. रविवारी आफ्रिकेविरुद्ध हरमनप्रीतने नऊ चौकारांच्या साहाय्याने १०३ धावा फटकावून सूर गवसल्याचे संकेत दिले. तिच्यासह डावखुऱ्या यास्तिका भाटियाने (५८) केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ९ बाद २४४ अशी धावसंख्या उभारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार सुने लस (८६) आणि लॉरा वॉल्व्हार्ट (८३) या आफ्रिकेच्या अनुभवी जोडीने झुंजार फलंदाजी केली. मात्र, भारताची डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडपुढे (४/४६) त्यांचा डाव गडगडला. अखेरच्या षटकांत मारिझेन कॅपला (३१) इतरांची साथ न लाभल्याने आफ्रिकेला ५० षटकांत ७ बाद २४२ अशा धावाच करता आल्या.