औरंगाबाद(प्रतिनिधी): पोखरा (नेपाळ) येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या आशिया ट्रायथलॉन कप २०२२ व साऊथ आशियाई चॅम्पियनशिपसाठी औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेच्या शंतनू शुक्ला, अजयसिंग पाल आणि अनिश शुक्ला या तिघांची भारतीय संघात निवड झाली आहे. निवड झालेले हे तिघे मराठवाड्यातील पहिलेच ट्रायथलॉनपटू आहे.
इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत शंतनू, अजयसिंग व अनिशने सुवर्ण कामगिरी करीत राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवला होता. हे तिनही खेळाडू एलिट मेन प्रकारात १५०० मी.स्विमिंग, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी रनींग करत पदकाचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करतील. या ट्रायथलॉनपटूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अभय देशमुख यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे.
पोखरा येथील स्पर्धेत भारतासह न्यूझीलंड, कझाकिस्तान, जपान, पोलंड, बांगलादेश, ऑस्ट्रिया इतर देशांचा समावेश आहे. या तिघांच्या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार अतुल सावे, महाराष्ट्र ट्रायथलॉनचे डॉ. दयानंद कुमार, राजेंद्र निंबाळते, अशोक काळे, नामदेव सोनवणे, संदीप चव्हाण, सचेंद्र शुक्ला, डॉ.संदीप जगताप, तांत्रिक प्रमुख डॉ.प्रफुल्ल जटाळे, अंकुशसिंग पाल, डॉ.सुनील देशमुख, निखिल पवार, अजय दाभाडे, नितीन बोंद्रे, अशोक वाघ आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.