खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करा आ.सतीश चव्हाण यांची कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे मागणी

औरंगाबाद(प्रतिनिधी): आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना दिला जाणारा दैनंदिन भत्ता अतिशय तुटपुंजा असून या दैनंदिन भत्त्यात वाढ करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
सुरत येथे मार्च 2022 मध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला खो-खो संघाने बलाढ्य मुंबई संघाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तब्बल 27 वर्षानंतर हा संघ अखील भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला. याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी कुलगुरू व विद्यापीठ महिला खो-खो संघाचे अभिनंदन करून खेळाडूंच्या काही समस्या कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या निदर्शनास दिल्या.
ज्या वेळेस आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी कुठलाही संघ आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करतो त्यावेळी प्रत्येक खेळाडूला दैनंदिन भत्ता म्हणून विद्यापीठाच्यावतीने केवळ 300 रूपय दिले जातात. आजच्या महागाईचा विचार केला तर 300 रूपयात चहा-नास्ता, दोन वेळचे जेवण हे विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा दैनंदिन भत्ता 300 रूपयां ऐवजी 1000 रूपय करावा. मुंबई विद्यापीठातील खेळाडूंना 1000 रूपय दैनंदिन भत्ता दिला जातो असे आ.सतीश चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या तयारीनिमित्त ज्यावेळेस विद्यापीठाच्यावतीने आपल्या विद्यापीठात ‘कॅम्प’ आयोजित केले जातात. त्यावेळी या ‘कॅम्प’साठी येणार्या खेळाडूंना फक्त एकच प्रवास भत्ता दिला जातो. (घर ते विद्यापीठ किंवा विद्यापीठ ते घर) एकीकडचा प्रवास खेळाडूंना स्व खर्चातून करावा लागतो. त्यामुळे कॅम्पसाठी येणार्या खेळाडूंना जाण्याचा व येण्याचा असा दोन्ही प्रवास भत्ता देण्यात यावा, कॅम्पसाठी खेळाडूंना दिल्या जाणारा दैनंदिन भत्ता 200 रूपया ऐवजी 500 रूपय करावा, विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार्या खेळाडूंना विद्यापीठाकडून मिळणारे ‘ट्रॅक सुट’, स्पर्धेचे ‘कीट’ हे अनेक वेळा त्यांच्या मापाचे नसतात. त्यामुळे हे ‘ट्रॅक सुट’, स्पर्धेचे ‘कीट’ उत्तम दर्जाचे व खेळाडूंच्या मापाचेच देण्यात यावे, अशा मागण्या आमदार चव्हाण यांनी केल्या आहेत.
Comments are closed.