तारांकित आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात टॉटनहॅमवर ३-२ अशी सरशी साधली. तसेच या हॅट्ट्रिकसह रोनाल्डोने अनोख्या विक्रमालाही गवसणी घातली.
३७ वर्षीय रोनाल्डो आता व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला असून त्याच्या खात्यावर तब्बल ८०७ गोल जमा आहेत.
त्याने जोसेफ बिकान (८०५) यांचा विक्रम मोडीत काढला. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना विक्रमी ११५ गोल मारले आहेत. तसेच त्याने स्पोर्टिग संघाकडून पाच, रेयाल माद्रिदकडून ४५०, युव्हेंटसकडून १०१ आणि मँचेस्टर युनायटेडकडून आतापर्यंत १३६ गोल केले आहेत. शनिवारी रात्री झालेल्या टॉटनहॅमविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने (१२, ३८, ८१वे मिनिट) तीन गोल झळकावत युनायटेडला यंदाच्या हंगामातील १४वा विजय मिळवून दिला. अन्य सामन्यांत, लिव्हरपूलने ब्रायटनवर, तर ब्रेंटफर्डने बर्नलीवर प्रत्येकी २-० अशी मात केली.