इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या अगोदर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यादरम्यान माध्यमांची उत्तरे देताना रोहितने आयपीएलमध्ये लागू होणाऱ्या तीन नियमांबद्दल मोठे व्यक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, आयपीएल सामन्यादरम्यान चुका होण्याची शक्यता कमी आहेत. तसेच, मंकडींगच्या नियमांवर तो म्हणाला की, आता फलंदाजांना सावध राहावे लागेल. झेलबादच्या नियमांमध्ये बदल झाल्यामुळे गोलंदाजी संघाला सामन्यात चांगली कामगिरी करण्याची संधी असणार आहे. रोहित शर्मा आयपीएल नियमामध्ये झालेल्या बदलांमुळे खूप खुश दिसत आहे.
आयपीएल २०२२मध्ये झेलबाद, मंकडींग आणि डीआरएस संबंधित तीन नियम बदलण्यात आले आहेत. तसेच, कोरोनामुळे सामन्यांसाठी संघांसाठीच्या नियमांमध्येसुद्धा बदल करण्यात आले आहेत. सुपर ओव्हरच्या एका नियमामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत.
डीआरएसचा नियम बदलला
याअगोदर इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक संघाला एका डावात एक डीआरएस मिळत होता. यावेळी दोन्ही संघांना एकूण चार डीआरएस मिळणार आहेत. पूर्वी एका संघाला दोन डीआरएस होते, एक फलंदाजीसाठी तर एक गोलंदाजीसाठी. आता एका संघाला चार डीआरएस असणार आहेत. ज्यापैकी दोन फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना दोन वापरता येतील.
हा नियम आल्याने सामन्यात चूक होण्याची शक्यता कमी होईल, असे रोहित शर्मा सांगितले. पंचाने चूक केली, तरी खेळाडू याच्या माध्यमातून योग्य निर्णय घेऊ शकतील.
कॅचआऊटचा नियमही बदलला
आता एखादा फलंदाज झेलबाद झाल्यावर पुढचा चेंडू फक्त नवीन फलंदाजाला खेळावा लागेल. आतापर्यंत असा नियम होता की, झेल घेण्यापूर्वी गोलंदाजाने जागा बदलली, तर नॉन- स्ट्राईकवर उभ्या असलेल्या गोलंदाजाने पुढचा चेंडू खेळायचा. आता असा नियम झाला आहे की, जेव्हा षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज झेलबाद होतो, तेव्हा पुढच्या षटकाचा पहिला चेंडू दुसऱ्या टोकाला उभा असलेला फलंदाज खेळणार.
रोहितच्या मते, हा नियम लागू केल्यामुळे गोलंदाजी संघाला पुनरागमन करण्याची चांगली संधी मिळेल. बोल्ड आणि एलबीडब्ल्यू सारख्या नियमांमध्ये नवीन फलंदाजाला पहिला चेंडू खेळावा लागायचा. आता कॅच आऊटच्या नियमातही असे घडल्यास गोलंदाजी संघाला पुनरागमन करण्याची चांगली संधी असेल.
मंकडींगचा नवा नियम
मंकडींग आता झेलबादच्या श्रेणीत ग्राह्य धरली जाईल. नॉन- स्ट्राईकवर उभ्या असलेल्या फलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडली, तर तो धावबाद मानला जाईल. पूर्वी हा नियम खेळाच्या विरुद्ध मानला जात होता आणि बहुतेक गोलंदाजांनी अशा पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याचे टाळले होते, परंतु हा नियम मान्य झाल्याने गोलंदाज जास्तीत जास्त फलंदाजांना अशा पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न करतील. याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, आता फलंदाजांना काळजी घ्यावी लागेल.
सुपर ओव्हरचा नवीन नियम
जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना बरोबरीत संपला आणि सुपर ओव्हर नसेल, तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाणार आहे. बऱ्यापैकी बरोबरीत सुटलेल्या सामन्यांमध्ये सुपर ओव्हर ही होतच असते आणि त्याद्वारे विजेता संघ घोषित केला जातो.