औरंगाबाद(प्रतिनिधी):सिनीअर टेबल टेनीस ग्रुपतर्फे टिळकनगर येथे रविवारी पार पडलेल्या ४० वर्षावरील खेळाडूंच्या टेबल टेनिस स्पर्धेत प्रा. मुकंद भुसारी, प्रशांत पाठक, प्रदिप वैद्य यांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. भुसारी संघाने फायनलमध्ये भालेराव संघावर ३-० गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. उपविजेता संघात राजीव भालेराव, अरविंद जोशी, रवि साळुंके यांचा समावेश आहे. स्पर्धेत १४ संघातील ४२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
तसेच बी.आर घनवट, डाॅ. प्रशांत देशपांडे, डाॅ. अक्षय मारावार आणि चंद्रभान खंदारे, सुजित मुंदडा, डाॅ. आशिश कोठारी यांच्या संघास विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला. विजेत्या खेळाडूंना निरंजन सोसायटीचे अध्यक्ष प्रदिप देशपांडे, सचिव विलास तागडे यांचे हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मे महिन्यात जापान येथे होणाऱ्या दिव्यांग आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या हरविंदरसिंग संधू यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलजितसिंग दारोगा, सतिश कल्याणकर यांच्यासह मुख्य पंच जगन्नाथ वाघ, माजी आरटीओ सरताज खान, कोच सय्यद नईम, शेख शौकत अली, मकसुद अली खान यांची उपस्थिती होती. स्पर्धेत पंच म्हणून अजय कुलकर्णी, अब्दुल बशीर, गोपाळ बावस्कर, अरविंद जोशी, प्रदिप पिलखानें यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. प्रशांत देशपांडे यांनी केले, तर प्रदिप वैद्य यांनी आभार मानले.