ऋतुराजची शतकांची हॅट्रिक! महाराष्ट्राचे नेतृत्त्व करताना विजय हजारे ट्रॉफीत पाडलाय धावांचा पाऊस

राजकोट – भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२१ -२२ ही देशांतर्गत वनडे स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने शनिवारी (११ डिसेंबर) महाराष्ट्र संघाचे नेतृत्त्व करताना केरळ संघाविरुद्ध शतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे हे त्याचे या स्पर्धेतील सलग तिसरे शतक आहे.

ऋतुराजचे केरळविरुद्ध शतक
शनिवारी महाराष्ट्राचा तिसरा सामना केरळविरुद्ध राजकोटच्या माधवराव सिंधिया मैदानात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ५० षटकात ८ बाद २९१ धावा केल्या. महाराष्ट्राकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सलामीला फलंदाजी करताना १२९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १२४ धावांची खेळी केली. त्याने ही खेळी करताना राहुल त्रिपाठीबरोबर तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली.

त्रिपाठीचं शतक थोडक्यात हुकलं. तो ९९ धावांवर बाद झाला. त्याने १०८ चेंडूत ११ चौकार मारले. ऋतुराज आणि त्रिपाठी शिवाय अन्य कोणत्या फलंदाजाला फार खास काही करता आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र संघ ५० षटकांत २९१ धावांपर्यंत पोहचू शकला. केरळकडून एमडी निशादने ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय बासिल थंपीने २ आणि सुरेश विश्वेशरने १ विकेट घेतली.

चार दिवसात तिसरं शतक
ऋतुराजचं हे गेल्या चार दिवसातील तिसरं शतक आहे. त्याने विजय हजारे २०२१-२२ ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून पहिल्या दोन सामन्यात देखील शतकं साजरी केली होती. त्याने मध्यप्रदेश विरुद्ध ८ डिसेंबर रोजी ११२ चेंडूत १३६ धावांची खेळी केली होती. हा सामना महाराष्ट्राने ५ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर त्याने ९ डिसेंबर रोजी छत्तीसगढ़ विरुद्ध १४३ चेंडूत नाबाद १५४ धावा केल्या होत्या. हा सामना महाराष्ट्राने ८ विकेट्सने जिंकला होता. ऋतुराजने आत्तापर्यंत ३ सामन्यांत ४१४ धावा केल्या आहेत.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग ३ डावात १२० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी देवदत्त पडीक्कलने असा कारनामा केला होता. त्याने २०२०-२१ सालच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हा पराक्रम केलेला.

 

You might also like

Comments are closed.