नवी दिल्ली : स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या बहुप्रतीक्षित हंगामाला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले. ५ मार्चपर्यंत या स्पर्धेचे साखळी सामने होतील.
करोनामुळे गेल्या वर्षी रणजी स्पर्धेचे आयोजन करणे शक्य झाले नाही. यंदाही १३ जानेवारीपासून २०२१-२२ वर्षांचा हंगाम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु देशभरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. २०१९-२०मध्ये झालेल्या अखेरच्या रणजी स्पर्धेतील अंतिम फेरीत सौराष्ट्रने बंगालला नमवले होते.
जैव-सुरक्षा परिघात होणाऱ्या या स्पर्धेतील साखळी सामने अहमदाबाद, कोलकाता, कटक, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, बडोदा, थिरुवनंतपुरम आणि राजकोट या नऊ शहरांत खेळवण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ३८ संघांपैकी प्रत्येकी चार संघांना आठ गटांत विभागण्यात येणार आहे. तर प्लेट गटात उर्वरित सहा संघांचा समावेश करण्यात येईल.