प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांकडून चीनचा धुव्वा;

मस्कत – भारतीय महिला संघाने सोमवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये विजयी पर्दापण करताना सलामीच्या लढतीत चीनचा ७-१ असा धुव्वा उडवला.

यंदा मस्कत (ओमान) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून भारतीय महिला संघाला प्रथमच यामध्ये खेळण्याची संधी लाभत आहे. त्यांनी चीनविरुद्धच्या सामन्याला आक्रमक सुरुवात केली. पाचव्या मिनिटाला नवनीत कौरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १२व्या मिनिटाला नेहाच्या गोलमुळे भारताची आघाडी दुप्पट झाली. उत्तरार्धात भारताच्या आक्रमणाला अधिकच धार आली. ४०व्या मिनिटाला अनुभवी वंदना कटारियाने भारताचा तिसरा गोल केला. त्यानंतर चीनने ४३व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. मग शर्मिला देवीने सलग दोन मिनिटांत दोन गोल झळकावत भारताला ५-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेर ५०व्या मिनिटाला गरुजत कौर, तर ५२व्या मिनिटाला सुशिलाने गोल झळकावल्याने भारताने हा सामना ७-१ असा फरकाने जिंकला. उभय संघांत मंगळवारी सलग दुसरा सामना खेळवला जाणार आहे.

You might also like

Comments are closed.