आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. केपटाऊन कसोटी सामन्याच्या (INDvsSA) दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आणि सोशल मीडियात प्रतिक्रियांचा महापूर आला. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रहाणे सतत फ्लॉप होत असल्याने त्याला आता एकाही डावात संधी द्यायला आवडणार नाही, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रहाणे खाते न उघडताच बाद झाला. दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले, पण इकडे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर केपटाऊन कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला. शेवटच्या डावात जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तो फक्त १ धाव करून बाद झाला आणि याच कारणामुळे त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यामुळे आता पुढच्या कसोटीत तो संघात दिसणार की नाही, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.
संजय मांजरेकर यांनीही अजिंक्य रहाणेवर निशाणा साधला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणात ते म्हणाले की, ‘अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममध्ये आहे. त्याला आता प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची गरज आहे. रहाणेला मी आता एका डावातही संधी देणार नाही. गेल्या ३-४ वर्षांतील रहाणेकडे पाहता तो पुन्हा फॉर्मात येईल असे वाटत नाही. मेलबर्नमध्ये त्याने शतक झळकावले, तेव्हा आशा होती, पण त्यानंतर काहीच झाले नाही.’
एकेकाळी अजिंक्य हा भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा समजला जायचा. पण सध्याच्या घडीला अजिंक्यला चांगली फलंदाजी करता येत नाही. तो सध्या धावांचा दुष्काळ अनुभवत आहे. तिसऱ्या कसोटीतील दोन्ही डावांतही अजिंक्य अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता यापुढे भारताच्या कसोटी संघात तो राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.