पुणे- महाराष्ट्रामध्ये आजतागायत शासनाचे जागतिक दर्जाचे रोईंग प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात आले नाही. सी.एम.ई येथे उत्कृष्ट रोईंग केंद्र आहे, परंतु ते महाराष्ट्र शासनाचे नसल्यामुळे खेळांडूना त्याचा वापर सहजपणे वापर करता येत नाही. राज्यातील खेळाडूंना अद्ययावत रोईंग प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता आहे. प्रशिक्षण आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जागतिक दर्जाचे रोईंग कोर्स आणि प्रशिक्षण केंद्र विकसित करण्याची मागणी महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र रोईंग असोसिएशन आणि कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे, बोट क्लब यांच्यावतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत असोसिएशनच्या वतीने ही मागणी करण्यात आली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय शेटे खजिनदार धनंजय भोसले सहसचिव दयानंद कुमार यांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र रोईंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर, सचिव संजय वळवी उपाध्यक्ष नरेंद्र कोठारी, प्रा. नामदेव हेडाऊ यावेळी उपस्थित होते.
नामदेव शिरगावकर म्हणाले, खडकवासला भागात अद्ययावत जागतिक दर्जाचे रोईंग केंद्र व्हावे, यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. यासंबंधी प्रस्ताव देखील महाराष्ट्र रोईंग असोसिएशनकडून मागविण्यात आला आहे. अनेक शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये तरुण मुला-मुलींना रोईंगचे प्रशिक्षण देण्यास देखील त्यांनी यावेळी सांगितले.
संजय वळवी म्हणाले, कमी झालेल्या पाण्याच्या पातळीमुळे शहरातील नदीकाठच्या सर्व रोईंग क्लबवर परिणाम झाला आहे. नदीतील खडक उघडे पडले आहेत, ज्यामुळे महागड्या रोईंग बोटी, ओर्स आणि मोटरबोट इंजिनचे नुकसान होते आहे.
नरेंद्र कोठारी म्हणाले, येरवडा पूल ते होळकर पूल हा 5 किमीचा पल्ला एकेकाळी लांब पल्ल्याच्या रोईंग प्रशिक्षणासाठी एक आदर्श ठिकाण होते, परंतु आता या पाण्यात प्रशिक्षण घेणे अत्यंत कठीण आहे. या नदीच्या किनारी जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक्स, ओपन एअर जिम इत्यादी विकसित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील वॉटर स्पोर्ट्सच्या विकासाबाबत विविध बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सी.ओ.ई.पी. मध्ये कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सी.एम.ई), बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बी.ई.जी.) आणि रॉयल सह कॅनॉट बोट क्लब यांच्या सहकार्याने बाह्य विद्यार्थ्यांसाठी खेळाशी संबंधित पायाभूत सुविधा देण्याबाबत चर्चा झाली.