केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली तिसरी आणि निर्णायक कसोटी अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने दुसऱ्या डावात आज २ बाद ५७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर राहुल-मयंक पुन्हा अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे ७० धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर आटोपला. कीगन पीरसनने झुंजार फलंदाजी करत ७२ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने तिखट मारा करत ५ बळी टिपले.
भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला.
वेगवान गोलंदाज जानसेनने त्याला १० धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. तर मयंक अग्रवाल (७) धावांवर कगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाला अर्धशतक गाठून दिले. त्यानंतर जानसेनने पुजाराला जास्त वेळ टिकून दिले नाही. त्याने पुजाराला वैयक्तिक ९ धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. परंतु तो सुद्धा पुन्हा अपयशी ठरला. रबाडाने रहाणेला (१) बाद केले. रहाणेनंतर विराटची साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाववेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला (३) लवकर तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या दिवसअखेर एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच बुमराहने सुरेख पद्धतीने मार्करामचा (८) त्रिफळा उडवला. संघाचा अर्धशतकी पल्ला गाठण्यापूर्वी केशव महाराजही (२५) उमेश यादवच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर कीगन पीटरसन आणि रुसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाला सावरलं. या दोघांनी संयमी भागीदारी रचत संघाचे शतक फलकावर लावले. उमेश यादवने ड्यूसेनला (२१) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या टेंबा बावुमाने पीटरसनला थोडी साथ दिली. पीटरसनने आपले अर्धशतक पूर्ण करत एका बाजूला किल्ला लढवला.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आधी बावुमाला आणि त्यानंतर काइल वेरेनला बाद करत आफ्रिकेला अजून संकटात टाकले. १५९ धावावर यजमानांनी ६ फलंदाज गमावले. तर बुमराहने जानसेनची दांडी गूल करत आफ्रिकेला सातवा धक्का दिला. बुमराहने ड्यूसेनला पुजारावकरवी झेलबाद करत आफ्रिकेची आशा संपुष्टात आणली. ड्युसेनने ९ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्यानंतर बुमराहने एनगिडीला बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव ७६.४ षटकात २१० धावांवर संपुष्टात आणला. बुमराहने ४२ धावांत ५ बळी घेतले. तर शमी आणि उमेश यादवला प्रत्येकी २ बळी मिळाले.