अहमदाबाद- कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मॅरेथॉन आणि खोखो खेळणारी महाराष्ट्राची प्रियांका भोपी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी खेळाडू ठरली. घर खर्च चालवण्याकरिता माझ्यासमोर खेळण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नव्हता. प्रारंभी मी मॅरेथॉन स्पर्धेत पळून घर खर्च भागवायचे. त्यानंतर मी खोखो खेळ खेळू लागले. खोखो खेळातून मिळालेल्या पैशातून मी कुटुंबाचा खर्च भागवत आहे अशी भावना प्रियांका भोपी या महाराष्ट्राच्या स्टार खोखोपटूने व्यक्त केली.
2018 मध्ये राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या प्रियांका भोपी हिचा खोखो खेळातील प्रवास क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या खेळाडूंसाठी खरोखरच प्रेरणादायी असाच आहे.प्रियांका भोपीचा खोखो खेळातील प्रवास अतिशय संघर्षाचा राहिला आहे. आई-वडील, मोठी बहिण आणि छोटी प्रियांका. असे हे भोपी कुटुंब. प्रियांकाची मोठी बहिण पूजा भोपी ही खोखो खेळ खेळायची. बहिणीमु्ळे प्रियांका खोखो खेळाकडे आकर्षित झाली.
खोखो खेळ खेळण्यापूर्वी प्रियांका भोपी ही मॅरेथॉन शर्यतीत सहभाग घ्यायची. मॅरेथॉन स्पर्धेतील पारितोषिक रक्कम हीच तिचे कुटुंब चालवण्याचा मुख्य मार्ग होता. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी प्रियांका मॅरेथॉन शर्यतीत धावायची. कल्याण मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉन, बदलापूर मॅरेथॉन, पनवले मॅरेथॉन अशा अनेक मॅरेथॉन स्पर्धेत प्रियांकाने पारितोषिके जिंकून आपला कुटुंबाचा खर्च भागवला आहे. या स्पर्धेतून प्रियांकाला दरमहा 10-15 हजार रुपयांची बक्षीसे मिळायची. या रक्कमेवरच तिचा घरखर्च चालत असे.
खोखो खेळाकडे कशी आकर्षित झाली याबद्दल सांगताना प्रियांका भोपी म्हणाली की, बदलापूर येथे शिवभक्त विद्यामंदिर शाळा आहे. बदलापूर भागातील साईगाव हे माझे मुळ गाव. शिवभक्त खोखो क्लबकडून मी खोखो खेळ खेळू लागले. नरेंद्र मेंगळे व पंढरीनाथ मेंगळे या प्रशिक्षकांमुळे मी खोखो खेळात पारंगत झाले. शाळेतील शिक्षकांनी देखील मला वेळोवेळी भरपूर मदत केली आहे.
पहिले मी मॅरेथॉन स्पर्धेतून बक्षीसे जिंकून घर चालवायचे आता खोखो खेळ खेळून घर खर्च भागवत आहे. माझे गाव एक खेेडेगाव असल्याने साहजिकच मुलगी म्हणून खेळण्यास विरोध होताच. परंतु, घर चालवण्यासाठी मला खेळण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय समोर दिसत नव्हता. खेळाचे मैदान गाजवण्यासाठी मी खूप संघर्ष केला आहे, असे प्रियांका भोपी हिने सांगितले.
मॅरेथॉन शर्यतीत पारितोषिके मिळायची. मला आंतरराष्ट्रीय पातळीवर जाता आले असते. कदाचित ऑलिम्पिकपर्यंत झेप घेता आली असती. मॅरेथॉनसोडून खोखो खेळण्यास प्राधान्य दिले याची खंत वाटत असली तरी खोखो खेळामुळे माझे घर चालते याचा मला आनंद आहे. खोखो खेळ निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आमच्या भागात खोखो खेळाचे प्रशिक्षक होते. मॅरेथॉनचे प्रशिक्षक नव्हते. तसेच खोखोचा उत्तम संघ देखील आहे. त्यामुळे मी खोखो खेळण्यास प्राधान्य दिले, आता एअर पोर्ट अॅथॉरिटीकडून मला दरमहा 20-25 हजार रुपये मिळतात. त्यात घर खर्च भागतो, असे प्रियांका भोपी हिने आवर्जून सांगितले.
सातवी इयत्तेपासून खोखो खेळ खेळणा-या प्रियांका भोपीची ही तब्बल 23 वी राष्ट्रीय स्पर्धा आहे. 18 वर्षांखालील गटात प्रियांकाने 5 तर सिनियर गटात 7 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 2018 मध्ये प्रियांका भोपीला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास प्रियांकाला आहे. प्रियांका म्हणते, संघातील सर्व खेळाडू उत्तम लयीत खेळत आहेत. संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. सुवर्णपदक जिंकूनच दसरा साजरा करणार असा विश्वास प्रियांकाने व्यक्त केला आहे.