सातारा (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ यांकडून ६४वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब लढतीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला. पृथ्वीराजने विशाल बनकरचा ५-४ असा पराभव केला.
दिनांक ५ एप्रिल सुरु झालेल्या या स्पर्धेत संबंधित विभागात भल्या भल्या पैलवानांना पराभवाचे पाणी पाजत विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील किताबी लढतीसाठी समोरासमोर उभे ठाकले होते. अंतिम किताबी लढत कशी होणार, दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मल्ल एकमेकांना कसे झुंज देणार आणि कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर या सर्व प्रश्नांची उत्तरे लाखो कुस्ती शौकिनांना शनिवार (दि. ९ एप्रिल) रोजी सायंकाळी मिळाली. (Vishal Bunkar vs Prithviraj Patil)
विशाल उर्फ प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात तुफानी कुस्ती झाली. मात्र, अखेर पृथ्वीराज पाटीलने मैदान मारत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आणि मानाची गदा जिंकली.
तत्पुर्वी, पृथ्वीराज पाटीलने पुण्याच्या हर्षद कोकाटेचा पराभव करत गादी विभागातून अंतिम फेरीत विजय मिळवला होता. तर, विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखला १३-१९ अशा गुण फरकाने हरवत माती विभागातून किताबी लढतीत एन्ट्री केली होती.