कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटीलने यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला आहे. सातऱ्यात रंगलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत विशालने अंतिम फेरीत सोलापूरच्या विशाल बनकरचा पराभव केला. १९ वर्षीय पृथ्वीराजने गादी फेरीत हर्षद कोकटेचा पराभव केला होता. ६४वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली.
२१ वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीचा मान कोल्हापुरला मिळला आहे. याआधी कोल्हापुरला २००० साली महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली होती. यावेळी हिंद केसरी विनोद चौगुले यांना महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला होता. आज झालेल्या रोमहर्षक लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराजने विशाल बनकरचा ५-४ असा पराभव केला. या लढतीत उतरण्यापूर्वी माती विभागातून विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखला १३-१९ अशा फरकाने हरवले होते.
कोल्हापुरच्या जालिंदर आबा मुंडेंच्या शाहू कुस्ती केंद्रात पृथ्वीराजने कुस्तीचे धडे गिरवले. पुण्यात आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये अमर निंबाळकर आणि राम पवार सयांनी यांच्या हाताखाली पृथ्वी परिश्रम घेत होता. तो आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.