IPL2022:आरसीबीचा तिसरा विजय;मुंबई इंडियन्स चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले

पुणे : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२२मध्ये सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईला ७ गड्यांनी मात खावी लागली. सूर्यकुमार यादवच्या (६८) वन मॅन शोमुळे मुंबईने बंगळुरूला १५२ धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. चांगल्या सुरुवातीनंतर अवघ्या २९ धावांत ६ फलंदाज गमावलेल्या मुंबईला सूर्यकुमारने आधार दिला. त्याने नाबाद खेळी करत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. प्रत्युत्तरात सलामीवीर अनुज रावत (६६) आणि विराट कोहली (४८) यांच्या उत्तम फलंदाजीमुळे बंगळुरूने सहज विजय नोंदवला. आरसीबीचा हा तिसरा विजय आहे.

बंगळुरूचा डाव

डावखुरा अनुज रावत आणि कप्तान फाफ डु प्लेसिस यांनी बंगळुरूला संयमी सुरुवात करून दिली. नवव्या षटकात या दोघांनी संघाचे अर्धशतक फलकावर लावले. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने डु प्लेसिसला (१६) बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अनुजने विराटसोबत भागीदारी केली. १७व्या षटकात अनुज तर १९व्या षटकात विराट माघारी परतला. अनुजने २ चौकार आणि ६ षटकारांसह ६६ धावा केल्या. तर विराटचे अर्धशतक (५ चौकार) दोन धावांनी हुकले. १९व्या षटकात मॅक्सवेल-कार्तिकने बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुंबईचा डाव

कप्तान रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईसाठी अर्धशतकी सलामी दिली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने रोहितला फसवले. रोहितने ४ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा केल्या. त्यानंतर मात्र चित्र पालटले. मुंबईचे इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, कायरन पोलार्ड, तिलक वर्मा आणि रमनदीप सिंह अवघ्या २९ धावांत तंबूत परतले. मग एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या सूर्यकुमारने धावगती वाढवली. त्याने दर्जेदार फलंदाजी करत मुंबईला दीडशेपार पोहोचवले. सूर्यकुमारने ५ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ६८ धावा तडकावल्या. २० षटकात मुंबईने ६ बाद १५१ धावा फलकावर लावल्या. आरसीबीकडून वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी २-२ बळी घेतले.

You might also like

Comments are closed.